GRAMIN SEARCH BANNER

होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल टँकर ‘देश गरिमा’ सुखरूप भारताकडे रवाना

दिल्ली: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय ध्वजधारी कच्च्या तेलाचा टँकर “देश गरिमा” यांनी १८ एप्रिल २०२६ रोजी होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली.

या जहाजावर ३१ भारतीय खलाशी आहेत आणि हे जहाज २२ एप्रिलला मुंबईत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

ही घडामोड अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा या महत्त्वाच्या सागरी मार्गावर सतत तणावाचे वातावरण आहे. मात्र, गेल्या २४ तासांत इतर दोन भारतीय जहाजांना धोक्याचा सामना करावा लागला. व्हीएलसीसी सनमार हेराल्ड आणि बल्क कॅरिअर जग अर्णव या जहाजांनी होर्मुझमधून जाताना गोळीबार झाल्याची माहिती दिली, त्यानंतर दोन्ही जहाजांना पुन्हा फारसच्या आखाताकडे परतावे लागले.

होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. येथे अलीकडच्या काळात अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी संबंधित तणावामुळे परिस्थिती संवेदनशील झाली आहे. त्यामुळे जहाजांच्या हालचालींवर धोका वाढला असून अनेक घटना समोर येत आहेत.

भारत सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेत इराणचे राजदूत यांना तलब केले आणि आपली चिंता व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, भारतासाठी सागरी व्यापार आणि खलाशांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच भारताने इराणकडे जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे.सरकारने स्पष्ट केले आहे की देशातील पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत आणि पुरेसा साठाही उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून इंधन खरेदी करू नये आणि अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारने सांगितले की सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत आणि परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि इतर यंत्रणा मिळून पश्चिम आशियातील भारतीयांच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. गरज भासल्यास नागरिकांच्या परतीची आणि मदतीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3485149
Share This Article