GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात 5 वर्षांत 816 चिमुकल्यांचा मृत्यू; माताआरोग्याकडे झालेल्या दुर्लक्षाचे भीषण चित्र

Gramin Varta
124 Views

रत्नागिरी : एका बाजूला मातृत्वाची स्वप्ने आणि दुसऱ्या बाजूला प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतर आवश्यक काळजी अभावी कोमेजलेली बालजीवनं… गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात ० ते ५ वर्षे वयोगटातील तब्बल ८१६ चिमुकल्यांचा अकाली मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. यात नवजात बालकांचे मृत्यू सर्वाधिक असल्याचे चित्र आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार ० ते १ वर्ष वयोगटातील ७२९ बालके, तर १ ते ५ वर्ष वयोगटातील ८७ बालकांचा मृत्यू झाला आहे. प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात योग्य काळजी न घेणे, कुपोषण, वेळेवर आरोग्यसेवा न मिळणे आणि लसीकरणातील दिरंगाई ही या मृत्यूची प्रमुख कारणे ठरत आहेत. जन्मतः मृत्यू दरात काही प्रमाणात घट झाली असली तरी १ ते ५ वर्ष वयोगटातील मृत्यू दरात चढउतार दिसून येत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर अजूनही मोठे आव्हान उभे आहे.

ग्रामीण भागातील मातांना अनेकदा प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीनंतरची आवश्यक काळजी मिळत नाही. योग्य मार्गदर्शनाचा अभाव, चुकीची जीवनशैली आणि आरोग्याविषयीचा कमी गांभीर्याचा दृष्टिकोन यामुळे माता व बाळ दोघांचेही आरोग्य धोक्यात येत आहे. काही ठिकाणी नवजात शिशु अतिदक्षता विभागांची कमतरता, बालरोगतज्ज्ञांची अपुरी उपलब्धता आणि सकस आहाराचा अभाव ही परिस्थिती अधिक गंभीर बनवत आहे. परिणामी अनेक बालके कुपोषणाला बळी पडत असून त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.

ही भीषण संख्या कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू असून अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांमार्फत गरोदर मातांची नोंदणी, वेळेवर तपासणी व योग्य उपचारांवर भर दिला जात आहे. गरोदरपणात नियमित वैद्यकीय तपासणी, लसीकरण, पोषक आहार आणि प्रसुतीनंतर बाळाच्या आरोग्याची सातत्याने तपासणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

बालमृत्यूची ही आकडेवारी केवळ संख्या नसून असंख्य कुटुंबांच्या अश्रूंची आणि अपूर्ण राहलेल्या स्वप्नांची कहाणी आहे. मातृ व बालआरोग्याकडे गांभीर्याने पाहणे ही केवळ आरोग्य यंत्रणेचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी ठरत आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये म्हणाले, “गरोदर मातांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित तपासणी व लसीकरण करून घ्यावे. बाळंतपणाची चाहूल लागल्यानंतर तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणी करून घ्यावी. पोषक आहार आणि योग्य काळजी घेतल्यास आई आणि बाळ दोघांच्याही आयुष्याचे संरक्षण होऊ शकते.”

Total Visitor Counter

3369387
Share This Article