GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात आंबा बागेत काम करणाऱ्या नेपाळी मजुराचा झोपेतच मृत्यू

Gramin Varta
11 Views
A shot in the morgue

राजापूर: तालुक्यातील विखारेगोठणे येथील एका आंबा बागेत मजुरीचे काम करणाऱ्या ५० वर्षीय नेपाळी मजुराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नारायण दोवारी थारू (मूळ रा. कपिलवस्तू, नेपाळ) असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो गेल्या काही काळापासून राजापूर येथील आनंद प्रभाकर मराठे यांच्या आंबा बागेत कामाला होता. ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नारायण थारू हा नेहमीप्रमाणे दुपारी जेवण करून बागेतील पत्र्याच्या शेडमध्ये विश्रांतीसाठी झोपला होता. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बागेतच काम करणाऱ्या सोहन नावाच्या दुसऱ्या मजुराने त्याला उठवण्यासाठी आवाज दिला. मात्र, नारायण याने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. यामुळे घाबरलेल्या सोहनने तातडीने बागेचे मालक आनंद मराठे यांना माहिती दिली. त्यानंतर नारायणला खासगी रुग्णवाहिकेने तातडीने ग्रामीण रुग्णालय राजापूर येथे नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.राजापूर पोलिसांनी या घटनेची दखल घेत बी.एन.एस.एस. कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूचा गुन्हा रजिस्टर क्रमांक १३/२०२६ अन्वये दाखल केला आहे. रात्री ९:२२ वाजण्याच्या सुमारास ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ऐन आंबा हंगामाच्या काळात नेपाळवरून रोजगारासाठी आलेल्या मजुराचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा मृत्यू नैसर्गिक कारणाने किंवा हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

Total Visitor Counter

3199495
Share This Article