GRAMIN SEARCH BANNER

लांज्यात चुलत भावांमध्ये जमिनीच्या वादातून हाणामारी;परस्परविरोधी तक्रारींवर तिघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
296 Views

लांजा/वार्ताहर : लांजा शहरातील वैभव वसाहत येथे बुधवारी (दि. १२ नोव्हेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास जमिनीच्या वादातून दोन सख्ख्या चुलत भावांमध्ये शिवीगाळ आणि हाणामारीची घटना घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, लांजा पोलिसांनी एकूण तिघांवर गुन्हा नोंदवला आहे.

ज्ञानदा पृथ्वीराज मोरे (वय २९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपावरून कुटुंबात वाद सुरू असून, त्यांच्या चुलत सासऱ्यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. बुधवारी रात्री चुलत दिर राजीव मोरे (वय ४०) आणि चुलत सासरे अनिल मोरे (वय ६५) यांनी तिच्या घरी येऊन शिवीगाळ केली आणि राजीव यांनी तिला ढकलून देत हातावर मारहाण केली. पत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या पती पृथ्वीराज मोरे (वय ३५) यांना अनिल मोरे यांनी लाकडी फळीने दोन्ही पायांवर मारहाण केली. या मारहाणीमुळे पती-पत्नी दोघेही जखमी झाले. या फिर्यादीनुसार पोलिसांनी राजीव अनिल मोरे आणि अनिल लहू मोरे या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, राजीव अनिल मोरे यांनीही पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, त्यांच्या म्हणण्यानुसार दुपारी चारच्या सुमारास पृथ्वीराज मोरे यांनी वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून त्यांचे आई-वडील यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. रात्री पुन्हा त्यांनी राजीव मोरे व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करून काठीने व हाताने मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी पृथ्वीराज प्रदीप मोरे यांच्याविरोधातही भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

या संपूर्ण घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे करीत आहेत.

Total Visitor Counter

3368656
Share This Article