देवरुख:रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावर आंबा घाटातील दख्खन येथे म्हैस घेऊन जाणाऱ्या एका व्यावसायिकाला अडवून, चाकूचा धाक दाखवत मारहाण आणि लूटमार करणाऱ्या टोळीचा देवरुख पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील प्रथमेश तानाजी दळवी हे ८ एप्रिल रोजी सायंकाळी रत्नागिरीतील वेतोशी येथून आपल्या बोलेरो गाडीत म्हैस भरून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आंबा घाटातील दख्खन येथे ‘पांडुरंग’ लिहिलेली थार गाडी आणि ‘भारत सरकार’चा स्टिकर लावलेल्या इनोव्हा गाडीतून आलेल्या आठ जणांनी दळवी यांची गाडी अडवली. आरोपींनी त्यांना गाडीतून खाली ओढून बेदम मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने इनोव्हा गाडीत कोंडले. तेथून त्यांना साखरपा येथील गंद्रे पेट्रोल पंपावर नेण्यात आले. तिथे आरोपींनी ५०,००० रुपयांची मागणी केली आणि दळवी यांच्या गाडीतील केबिनमध्ये ठेवलेले २५,००० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ‘जर पोलिसांत तक्रार केली तर याद राख,’ अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले होते.
या धक्कादायक घटनेनंतर प्रथमेश दळवी यांनी देवरुख पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी तात्काळ तपास पथके रवाना केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे फरहान रशिद मुल्ला (४२, रा. कोकण नगर), प्रथमेश सचिन भाटकर (२४, रा. गोळप), सर्वेश सुभाष किर (२२, रा. सोमेश्वर), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (२६, रा. कुवारबांव) आणि भूषण बिपेंद्र सावंत (२६, रा. मिऱ्या) या पाच जणांना रत्नागिरी परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली.
या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, शांताराम पंदेरे, प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, नितीन जाधव, प्रशांत साळुंखे, अमर सुतार आणि रेश्मा चव्हाण यांनी सहभाग घेतला. गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून या यशस्वी कामगिरीबद्दल रत्नागिरी पोलीस दलाचे कौतुक होत आहे.







