GRAMIN SEARCH BANNER

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ‘एसआरके’ क्लबचे यश

Gramin Varta
289 Views

तीन खेळाडूंना रौप्यपदक; नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्याकडून गौरव

रत्नागिरी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे संपन्न झालेल्या ३५ व्या क्युरोगी आणि ११ व्या पुमसे सब-ज्युनिअर राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या एसआरके तायक्वांदो क्लबच्या खेळाडूंनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना या क्लबच्या खेळाडूंनी राज्याच्या नकाशावर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.

कुडाळ येथील वासुदेव हॉलमध्ये २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ४०० खेळाडू सहभागी झाले होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतींमध्ये एस आर के क्लबच्या अर्जुन पवार, श्रीनिधी पाटिल आणि तुळजा हर्ष या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदक पटकावले. या खेळाडूंच्या यशाबद्दल रत्नागिरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी सर्व खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले.

या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याने सांघिक कामगिरीतही छाप पाडली आहे. जिल्ह्याने क्युरोगी प्रकारात तृतीय क्रमांकाचा, तर पूमसे प्रकारात प्रथम क्रमांकाचा चषक (ट्रॉफी) पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. या स्पर्धेत राष्ट्रीय पंच सुजल साळुंखे यांनी राज्य स्पर्धेत पंच म्हणून महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

या यशस्वी खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक शाहरुख शेख आणि मिलिंद भागवत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल ‘तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे यांच्यासह जिल्हा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे कौतुक केले आहे.

तसेच एसआरके क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत आणि पालकांनी खेळाडूंच्या जिद्दीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitor Counter

3210525
Share This Article