GRAMIN SEARCH BANNER

मनसेचा २० वा वर्धापनदिन; १० मार्चपासून सदस्य नोंदणी मोहीम होणार सुरू

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापनदिन ९ मार्च २०२६ रोजी साजरा होत असून यंदा या निमित्ताने पक्षाने मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी मोहिमेची घोषणा केली आहे.पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना उद्देशून संदेश देत १० मार्चपासून सदस्य नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या हक्कांसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा हा वर्धापनदिन असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.या मोहिमेची सुरुवात ऐतिहासिक रायगड किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून केली जाणार आहे. रायगड हा केवळ महाराजांच्या वास्तव्याचा साक्षीदार नसून शिवराज्याभिषेक या ऐतिहासिक घटनेचाही साक्षीदार असल्याने या पवित्र ठिकाणाहून सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

सदस्य नोंदणी ही केवळ विद्यमान महाराष्ट्र सैनिकांपुरती मर्यादित नसून महाराष्ट्राच्या घडणीत योगदान देण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या मोहिमेत सहभागी करून घेण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. सध्याच्या परिस्थितीबद्दल नाराजी असलेल्या आणि महाराष्ट्राच्या नव्या उभारणीसाठी काम करू इच्छिणाऱ्या नागरिकांना पक्षासोबत जोडण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.यावेळी सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपातही करण्यात येणार असून त्याबाबतचा सविस्तर तपशील १० मार्चला जाहीर केला जाणार आहे. फक्त शाखांच्या बाहेर स्टॉल लावण्यापेक्षा बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, मैदानं आणि बागा यांसारख्या गर्दीच्या ठिकाणीही सदस्य नोंदणीची टेबल्स लावण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना पक्षाच्या नवनिर्माणाच्या विचाराशी जोडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी, शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष आणि अन्य नेत्यांना कार्यकर्त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आदेश देण्यात आल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. सदस्य नोंदणीचा उद्देश केवळ आकड्यांवर भर देणे नसून मराठी माणसामध्ये महाराष्ट्रासाठी काम करण्याची किती तीव्र भावना आहे हे दाखवून देणे असल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान, १९ मार्चला गुढी पाडव्याला शिवतीर्थावर आपली भेट होईलच असे राज ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र दर्शन घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Total Visitor Counter

3485142
Share This Article