GRAMIN SEARCH BANNER

लोटे एमआयडीसीत ‘थर्स ऑरगॅनिक’मध्ये ड्रमचा स्फोट; आग नियंत्रणात, कामगार किरकोळ जखमी

Gramin Varta
106 Views

खेड:  तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील ‘थर्स ऑरगॅनिक’ या रासायनिक कारखान्यात सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रसायनाच्या ड्रमचा स्फोट झाला. कारखाना व्यवस्थापनाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.या धावपळीत एका कामगाराचा पाय मुरगळून तो किरकोळ जखमी झाला.

लोटे एमआयडीसीतील डॉ. खान कंपनीतील स्फोटाची घटना ताजी असतानाच ‘थर्स ऑरगॅनिक’मध्ये घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यात नवीन उत्पादनासाठी प्रायोगिक तत्त्वावर ड्रममध्ये रसायनांचे मिश्रण करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मात्र योग्य ती खबरदारी न घेतल्याने ड्रममधील रसायनाचे तापमान अचानक वाढले आणि त्यातून रसायनाने पेट घेतला. त्यामुळे संबंधित ड्रमचा स्फोट झाला.स्फोटाचा आवाज नजीकच्या अग्निशमन दलापर्यंत पोहोचल्याने अग्निशमन अधिकारी नलावडे यांनी जवानांसह अग्निशमन बंबासह घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत कारखाना व्यवस्थापनाने आगीवर नियंत्रण मिळविले होते.

या गोंधळात एका कामगाराचा धावताना पाय मुरगळल्याने तो किरकोळ जखमी झाला. कारखाना व्यवस्थापनाने त्याला तत्काळ खाजगी वाहनाने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.घटनेनंतर नजीकच्या चाळकेवाडी गावातील ग्रामस्थांनी कारखान्याला भेट देऊन प्रकाराची माहिती घेतली. कारखान्यात प्रयोग किंवा प्रक्रिया करताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात तसेच परिसरात मानवी वस्ती असल्याचे भान ठेवावे, अशी सूचना ग्रामस्थांनी कारखाना व्यवस्थापनाला केली.

Total Visitor Counter

3344412
Share This Article