GRAMIN SEARCH BANNER

ऑनलाइन औषध विक्रीवर कठोर निर्बंधांची मागणी; आमदार शेखर निकम यांनी घेतली अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांची भेट

Gramin Varta
66 Views

मुंबई: राज्यात वाढत्या ऑनलाइन औषध विक्रीमुळे जनआरोग्य आणि रुग्ण सुरक्षेसमोर निर्माण झालेल्या गंभीर आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची मंत्रालयात भेट घेऊन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष वेधले आहे. ऑनलाइन औषध विक्रीवर कठोर नियंत्रण आणण्यासाठी शासन स्तरावर ठोस कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

ऑनलाइन माध्यमातून औषधे मागवताना वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनची योग्य पडताळणी केली जात नसल्याने रुग्ण सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच, ऑनलाइन कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलतींमुळे पारंपरिक आणि अधिकृत औषध विक्रेत्यांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत असून, त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. चिपळूण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार निकम यांची भेट घेऊन या समस्यांबाबत निवेदन दिले होते. या निवेदनाची गंभीर दखल घेत आमदार निकम यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

औषध विक्री हा अत्यंत संवेदनशील विषय असून तो थेट जनतेच्या आरोग्याशी संबंधित आहे. त्यामुळे या क्षेत्रात नियमावलीची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत आमदार निकम यांनी व्यक्त केले. अवैध ऑनलाइन औषध विक्रीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत आणि अधिकृत औषध विक्रेत्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली. जनतेचे आरोग्य, रुग्णांची सुरक्षितता आणि अधिकृत औषध विक्रेत्यांचे हित जपण्यासाठी शासन स्तरावर सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहे.

Total Visitor Counter

3399916
Share This Article