GRAMIN SEARCH BANNER

लांजा: मुक्या प्राण्याप्रती पोलिसांची माणुसकी; जखमी श्वानासाठी धावले मदतीला

लांजा (प्रतिनिधी): पोलीस दल केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच नाही, तर संकटात सापडलेल्या मुक्या जीवांच्या रक्षणासाठीही सदैव तत्पर असते, याची प्रचिती लांजा शहरात आली आहे. मंगळवारी दुपारी लांजा पंचायत समिती कार्यालयासमोर एका जखमी श्वानाची रस्त्यावर तडफड सुरू असताना, लांजा पोलिसांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे सध्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
रस्त्यावरून येणारे-जाणारे अनेक वाहनचालक आणि पादचारी या श्वानाकडे दुर्लक्ष करत असताना, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन भुजबळराव आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्या जखमी श्वानाला अत्यंत सुरक्षितपणे रस्त्याच्या बाजूला केले आणि त्याच्या अंगावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे, तर पोलिसांनी तातडीने लांजा नगरपंचायत प्रशासनाशी संपर्क साधून मदतीसाठी पाचारण केले.

नगरपंचायतीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी जखमी श्वानाला पुढील उपचारासाठी नेले. मात्र, दुर्दैवाने या सर्व प्रयत्नांनंतरही त्या श्वानाचा मृत्यू झाला. श्वानाचा जीव वाचवण्यात यश आले नसले, तरी कर्तव्यावर असताना एका मुक्या प्राण्याच्या मदतीसाठी पोलिसांनी जी तत्परता आणि माणुसकी दाखवली, त्याचे शहरभर कौतुक होत आहे. या घटनेमुळे लांजा पोलिसांची एक संवेदनशील प्रतिमा जनमानसात उमटली आहे.

Total Visitor Counter

3400041
Share This Article