GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी पालिकेला निवडणुकीचा ‘फायदा’; उमेदवारांच्या धडपडीतून ६० लाखांची विक्रमी करवसुली

Gramin Varta
51 Views

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागताच त्याचा एक अनपेक्षित आणि सुखद धक्का पालिकेच्या तिजोरीला बसला आहे. एरवी करवसुलीसाठी कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या दारात खेटे घालावे लागतात, परंतु निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुकांनी स्वतःहून पुढाकार घेत थकबाकी भरल्याने पालिकेच्या खात्यात तब्बल ६० लाख रुपयांची भर पडली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पालिकेचा कोणताही कर थकीत नसल्याचा दाखला जोडणे बंधनकारक असल्याने, इच्छुक उमेदवारांनी आपली आणि आपल्या सूचकांची थकबाकी तातडीने भरल्याने ही विक्रमी वसुली शक्य झाली आहे.

रत्नागिरी पालिकेची वार्षिक घरपट्टी आणि पाणीपट्टीची एकूण वसुली साधारणतः १२ ते १४ कोटींच्या घरात असते. आर्थिक वर्ष संपताना म्हणजे मार्चअखेरपर्यंत यातील ६० ते ७० टक्के वसुली करण्यासाठी पालिकेच्या मालमत्ता विभागाला मोठी कसरत करावी लागते. करदात्यांना वारंवार नोटिसा बजावणे, मुदत संपल्यावर अंतिम नोटीस देणे आणि तरीही दाद न मिळाल्यास नळजोडणी तोडणे किंवा मालमत्ता सील करणे यांसारखी कठोर पावले उचलूनही थकबाकीचा आकडा मोठाच राहतो. मात्र, या सार्वत्रिक निवडणुकीने प्रशासनाचे हे काम अत्यंत सोपे केले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणाऱ्या उमेदवारांना आपण पालिकेचे देणेकरी किंवा थकबाकीदार नसल्याचे सिद्ध करणे अनिवार्य असते. तसेच त्यांच्या घरी शौचालय असणे आणि मालमत्तेचे प्रतिज्ञापत्र सादर करणे यांसारख्या अटींची पूर्तता करावी लागते. ‘ना हरकत दाखला’ मिळवण्यासाठी उमेदवारांनी ही थकबाकी भरण्याला प्राधान्य दिले.

या प्रक्रियेत केवळ उमेदवारांचाच कर वसूल झाला नाही, तर त्यांना सूचक म्हणून ज्यांनी सह्या केल्या, त्यांचाही फायदा झाला आहे. नियमानुसार केवळ उमेदवारच नव्हे, तर त्याच्या अर्जावर सूचक म्हणून नाव असलेल्या व्यक्तीकडेही पालिकेची थकबाकी असता कामा नये. अपक्ष उमेदवाराला ५ सूचक, तर राजकीय पक्षाच्या उमेदवाराला एका सूचकाची आवश्यकता असते. आपल्या अर्जात कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी उमेदवारांनी स्वतःच्या खिशातून सूचकांचाही कर भरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे उमेदवारांच्या या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे सूचक मंडळी मात्र फुकटात करमुक्त झाली आहेत.

सध्या रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीसाठी १३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, ज्यापैकी काहींचे अर्ज छाननीनंतर बाद झाले असून सध्या १२ आज अर्ज माघारीच्या दिवशी हे चित्र आणखी स्पष्ट होईल; परंतु या सर्व प्रक्रियेत पालिकेची आर्थिक बाजू मात्र भक्कम झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या धावपळीत एकट्या घरपट्टीच्या माध्यमातून ५६ लाख रुपये जमा झाले असून, उर्वरित रक्कम पाणीपट्टीच्या स्वरूपात वसूल झाली आहे. अशा प्रकारे, निवडणुकीच्या रणधुमाळीत कोणताही गाजावाजा न करता किंवा जप्तीची कारवाई न करता पालिकेने ६० लाखांच्या वर करवसुली करण्याचा टप्पा सहज गाठला आहे.

Total Visitor Counter

3199515
Share This Article