तुषार पाचलकर / राजापूर :पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या साटवली–अनुस्कुरा–मलकापूर ते विटापेठ राज्यमार्गावरील ओणी–पाचल–अनुस्कुरा रस्ता तसेच पाचल–तळवडे–जवळेथर मार्ग दुरवस्थेला आला असून, जूनपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांनाही या रस्त्यांमुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.
याबाबत वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी काल आयोजित सभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. या बैठकीत जर १६ सप्टेंबरपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही तर १७ सप्टेंबर रोजी पाचल बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारो नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा ठाम इशारा देण्यात आला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वाहतुकीतील अडचणींमुळे रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात या रस्त्यावरून प्रवास करणे जीवघेणे ठरत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रिय कार्यपद्धतीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभागाला निवेदन सादर केले जाणार असून दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात यावीत, अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून तीव्र भूमिका घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने न झाल्यास १७ सप्टेंबरला पाचल बाजारपेठेत तीव्र आंदोलन
