GRAMIN SEARCH BANNER

आमदार किरण सामंत यांनी घेतली महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक

नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज समस्या, अपुरा दाब, वारंवार होणारे ट्रिपिंगबाबत केली सविस्तर चर्चा

लांजा : आमदार किरण सामंत यांनी महावितरण विभागाच्या विविध कामांचा आढावा घेण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. या बैठकीत नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्या, अपुरा दाब, वारंवार होणारे ट्रिपिंग, तसेच रखडलेली वीज विकासकामे यांचा सविस्तर आढावा घेत त्वरित तोडगा काढण्याचे निर्देश दिले.

सदर आढावा बैठक आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत बुधवार दुपारी चार वाजता तहसीलदार कार्यालय लांजा येथे पार पडली. यावेळी व्यासपीठावर आमदार सामंत यांच्यासह तहसीलदार प्रियांका ढोले, कार्यकारी अभियंता महावितरण विभागीय कार्यालय रत्नागिरीचे जितेंद्र फुलपगारे, उपकार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग लांजाचे संतोष चव्हाण, शिवसेना शिंदे पक्षाचे विधानसभाक्षेत्र प्रमुख सुनिल उर्फ राजू कुरूप आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार सामंत यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, ग्रामीण व शहरी भागांतील नागरिकांना सुरळीत आणि अखंड वीज पुरवठा मिळणे अत्यावश्यक आहे. तसेच रखडलेल्या वीज योजनेचे काम तत्काळ पूर्ण करून जनतेला दिलासा द्यावा असे निर्देश दिले. महावितरणच्या कामकाजात पारदर्शकता ठेवून नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण व्हावे यासाठी अधिकाऱ्यांनी सजग राहण्याचे आवाहन आमदार सामंत यांनी केले.

त्याचप्रमाणे यावेळी प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. तालुक्यातील उपळे सब डिव्हिजन जागा खरेदी, कर्मचारींची रिक्त पदे, वीज पुरवठा करताना अडथळा ठरणारी तोडण्यासाठी झाडे कटिंग एजन्सी नेमणे तसेच अपूर्ण आणि दुरुस्तीची कामे गणेशोत्सवापूर्वी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्मार्टमीटर, बिल दुरुस्ती, फॉल्टीमीटर, वेडेवाकडे धोकादायक पोल बदलणे, वीरगाव नवीन सबस्टेशन इमारत बांधकाम अशा विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

दरम्यान, या बैठकीत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, वीजपुरवठा आणि प्रशासकीय कार्यपद्धती अधिक परिणामकारक कशा करता येतील यावर भर देण्यात आला. तर बैठकीत घेण्यात आलेले निर्णय लवकरात लवकर अंमलात आणून लांजा आणि परिसरातील वीज सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे आश्वासन महावितरण विभागाने दिले.

Total Visitor Counter

2455606
Share This Article