आसगे-तळवडे-दाभोळे मार्गावर बेनी नदीच्या वळणावरील घटना
लांजा : तालुक्यातील आसगे-तळवडे-दाभोळे मार्गावर बेनी नदीच्या धोकादायक वळणावर रानडुक्कराने दिलेल्या जोरदार धडकेत एक मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या अपघातात आसगे येथील प्रगतशील शेतकरी दिनकर मांडवकर (५० वर्षे) हे जबर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मांडवकर हे गेल्या दोन वर्षांपासून कलिंगडाची यशस्वी शेती करून चांगले उत्पन्न घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मोटरसायकलवरून कलींगड घेऊन आसगेच्या दिशेने निघाले होते. त्यांच्या पुढे कलिंगडाचा टेम्पो जात असताना ते पाठीमागून येत होते, मात्र बेनी नदीच्या वळणावर अचानक समोरून आलेल्या डुक्कराने त्यांच्या दुचाकीला एवढी भीषण धडक दिली की, मांडवकर थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात फेकले गेले.
अपघाताची भीषणता एवढी होती की त्यांची मोटरसायकल रस्त्यावरच पडली होती. याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या एका रिक्षा चालकाने रस्त्यावर पडलेली मोटरसायकल पाहिली आणि रिक्षा थांबवून आजूबाजूला शोध घेतला असता त्यांना दिनकर मांडवकर गंभीर अवस्थेत गटारात पडलेले आढळून आले. त्यानंतर तातडीने त्यांच्या कुटुंबीयांना पाचारण करून त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, याच वळणावर गेल्या वर्षभरात अपघाताची ही तिसरी घटना असून यापूर्वी रिक्षा व्यावसायिक सागर भारती आणि मोटरसायकलस्वार रुपेश धावडे हे देखील अशाच प्रकारे डुक्कराच्या धडकेत जखमी झाले होते. एका बाजूला वन्य प्राण्यांना मारल्यास गुन्हे दाखल करणारा वनविभाग, रानडुक्कराच्या धडकेमुळे आयुष्यभराची जखम सोसणाऱ्या दिनकर मांडवकर यांना योग्य नुकसान भरपाई देणार का, असा संतप्त सवाल आता आसगे मांडवकरवाडी येथील ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.





