साखरपा भागातील नागरिकांच्या सेवेसाठी अधिक ताकद: मंत्री उदय सामंत, किरण सामंत व शेखर निकम यांचे प्रोत्साहन
साखरपा: शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे आणि जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी अहोरात्र झटणारे साखरपा मुर्शी (दख्खन) विभागातील लोकप्रिय आणि कार्यक्षम नेते, माजी सरपंच श्री. मंगेश दळवी यांची संजय गांधी निराधार अनुदान योजना तालुका समितीवर सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे साखरपा आणि परिसरातील नागरिकांच्या कल्याणाच्या कार्याला अधिक बळ मिळणार आहे.
मंगेश दळवी हे स्थानिक पातळीवर शासकीय योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतात. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि निःस्वार्थ समाजकार्याची दखल घेत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री मा. श्री. उदय सामंत साहेब, किरण भैया सामंत आणि आमदार शेखर निकम साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना तालुका समितीवर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे दळवी यांना अधिक ताकदीने आणि प्रभावीपणे लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली असून, ही निवड म्हणजे त्यांच्या आजवरच्या जनसेवेचा गौरव आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना ही समाजातील गरीब, निराधार, विधवा आणि गरजू व्यक्तींना आर्थिक आधार देणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या समितीवर सदस्य म्हणून कार्यरत राहिल्याने, दळवी यांना तालुक्यातील गरजू लोकांना शासकीय अनुदानाचा लाभ जलद गतीने मिळवून देण्यासाठी अधिक थेटपणे कार्य करता येणार आहे.
श्री. मंगेश दळवी यांच्या या महत्त्वाच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करणाऱ्यांमध्ये विलास चाळके साहेब, जया माने साहेब, संजय सुर्वे, बापु शेट्ये आणि केतन दुधाणे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचा समावेश आहे. या निवडीमुळे साखरपा-मुर्शी परिसरातील लोकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगेश दळवी यांच्या माध्यमातून आता निराधार योजना अधिक गतिमान होईल, असा विश्वास सर्वसामान्यांना वाटत आहे.