राजापूर: शहरातील रस्त्यांवर बसून मच्छी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला होता. या निर्णयानुसार, सर्व विक्रेत्यांनी केवळ मच्छी मार्केटमध्येच नेमून दिलेल्या ठिकाणी आपला व्यवसाय करावा, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, या आदेशाला काही विक्रेत्यांनी पुन्हा एकदा हरताळ फासला असून, शिवाजी पथवर रस्त्यावर बसून मच्छी विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गत महिन्यात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर नगर परिषदेने महिला मच्छी विक्रेत्यांची बैठक घेऊन २० जुलैपासून सर्वांनी मच्छी मार्केटमध्येच व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. सुरुवातीला काही दिवस या आदेशाचे पालन करण्यात आले.
परंतु, आता पुन्हा एकदा काही ठराविक महिला विक्रेत्यांकडून शिवाजी पथवर रस्त्यावरच मच्छी विक्री सुरू झाली आहे. या महिला नेहमीच नगर परिषदेच्या आदेशाला धुडकावून लावत असल्याचा आरोप होत आहे. अशा परिस्थितीतही प्रशासन या महिला विक्रेत्यांवर कठोर कारवाई का करत नाही, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. नगर परिषदेने यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.