पालकमंत्री उदय सामंत यांनी उपाययोजना करण्याच्या सूचना देताच निवळकर यांनी एस. टी. साठी अडथळा ठरणारे गटाराचे काम लावले मार्गी
रत्नागिरी : निवळी गावातील मालपवाडी बससेवा अनेक दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रश्नाची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्ते, उपसरपंच संजय सुरेश निवळकर यांनी स्वतः पुढाकार घेत एस. टी. साठी अडथळा ठरणारे गटाराचे काम स्वखर्चातून पूर्ण करून बससेवा पुन्हा सुरू होण्यासाठी मार्ग मोकळा केला.
चौपदरीकरणाच्या कामामुळे बस वळणाच्या ठिकाणी वीज खांब अडथळा ठरत असल्याने बस निवळीमध्ये येत नव्हती. परिणामी नागरिक, विद्यार्थ्याना मनस्ताप सहन करावा लागत होता. सेवा विस्कळीत झाली होती. हा प्रश्न यापूर्वीच संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून निकाली काढण्यात आला होता. मात्र, त्यानंतर उघड्या गटारामुळे बसला सुरक्षितरीत्या वळणे शक्य होत नसल्याने सेवा पुन्हा सुरू होऊ शकत नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांनी हा प्रश्न आमदार निलेश राणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यापर्यंत पोहोचवला.
पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने या प्रश्नाची दखल घेत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यानंतर संजय निवळकर यांनी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता स्वतःच्या खर्चातून सिमेंट पाईप, काँक्रीट, मशिनरी आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून गटाराचे काम पूर्ण केले. त्यामुळे बससेवा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांनी निवळकर यांचे कौतुक केले.
यावेळी संजय निवळकर यांनी सांगितले की, “पालकमंत्री उदय सामंत यांच्या काम करण्याच्या वेगवान आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीने मी प्रभावित झालो आहे. लोकांची अडचण समजून घेऊन ती तातडीने सोडविण्याचा त्यांचा दृष्टिकोन आम्हा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार निलेश राणे यांच्या आशीर्वादाने गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे काम सातत्याने सुरू राहील.”
निवळकर यांनी पुढे सांगितले की, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी केवळ तक्रारी करण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून लोकांच्या समस्या सोडविणे अधिक महत्त्वाचे आहे.
गावाच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेऊन काम केल्यास नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होतो. त्यामुळे भविष्यातही निवळी गावातील विविध विकासकामांचा पाठपुरावा करून ती पूर्णत्वास नेण्याचा आपला प्रयत्न कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवळी मालपवाडी बससेवा पुन्हा सुरू होण्यासाठी झालेल्या या प्रयत्नांमुळे ग्रामस्थांनी संजय निवळकर यांच्या कार्याचे स्वागत केले असून, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पातळीवर प्रश्न सोडविण्याची ही कार्यपद्धती इतरांसाठीही आदर्श ठरत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
निवळी मालपवाडी बससेवा पुन्हा मार्गी; संजय निवळकर यांनी स्वखर्चातून दूर केला अडथळा
Leave a Comment





