शेतकऱ्याचे अंदाजे ३.१५ लाख रुपयांचे मोठे नुकसान
मंडणगड : तालुक्यात कोंडगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेत, एका शेतकऱ्याचा गोठा भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आणि संपूर्ण जळून खाक झाला. या दुर्घटनेत गोठ्यात बांधलेल्या तीन म्हशींचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. प्राथमिक पंचनाम्यानुसार, या आगीत अंदाजे ३.१५ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही हृदयद्रावक घटना कोंडगाव येथील महामुद अ. वहाब हसवारे यांच्या शेतातील गोठ्यात घडली. हसवारे यांनी नेहमीप्रमाणे रात्री उशिरा गोठ्यात डास आणि माशा पळवून लावण्यासाठी धूर केला होता. धूर पूर्णपणे विझल्याची खात्री केल्यानंतर ते घरी निघून आले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास अचानक गोठ्याला आग लागली.
प्राथमिक तपास आणि अंदाजानुसार, धुरामुळे निर्माण झालेल्या उष्णतेमुळे किंवा पूर्णपणे न विझलेल्या एखाद्या ठिणगीमुळे गोठ्याने पेट घेतला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले, कारण गोठ्यात म्हशींच्या चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाताचा पेंढा (गवत) भरून ठेवण्यात आला होता. या पेंढ्याने पेट घेतल्यामुळे आग आणखी भडकली आणि संपूर्ण गोठा जळून खाक झाला. ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे परिसरातील कोणालाही तिचा थांगपत्ता लवकर लागला नाही. जेव्हा आग पूर्णपणे पसरली, तेव्हा ही घटना उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे हसवारे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या तीन म्हशींचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.