GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये मंदिरातील घंटा चोरी करणारा भामटा गजाआड; रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील १६ चोऱ्यांचा उलगडा

Gramin Varta
316 Views

खेड / प्रतिनिधी: गेल्या वर्षभरापासून रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यातील विविध मंदिरांमधून घंटा चोरणाऱ्या भामट्याला खेड पोलिसांनी अखेर अटक केली आहे. राकेश तुळशीराम पडवकर (वय ३७, रा. लोणावळा–मावळ, पुणे) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याकडून सुमारे ६ लाख ५५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या अटकेमुळे दोन्ही जिल्ह्यांतील एकूण १६ चोरीच्या घटनांचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

३ ऑक्टोबर २०२५ रोजी खेड तालुक्यातील शिरगाव खुर्द–शिवाजीनगर येथील श्री काळकाई मंदिरातून पितळी घंटा व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीडीआर चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीनुसार संशयित हा रायगड व रत्नागिरी परिसरात वावरत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. जी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने सापळा रचला. या पथकात रोहिदास केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल अजय कडू, वैभव ओहोळ, विजेंद्र सातार्डेकर, कृष्णा दराडे आणि शिरीष साळुंके यांचा समावेश होता.

सापळा यशस्वी ठरवत पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. चौकशीत आरोपीने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दाभोळ, दापोली, मंडणगड, बाणकोट तसेच रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर परिसरातील मंदिरांतून घंटा व अन्य साहित्य चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून पितळी धातूच्या घंटांसह अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Total Visitor Counter

3246398
Share This Article