रत्नागिरी : जिल्ह्यात यापूर्वी आलेला महापूर आणि चक्रीवादळाची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणांनी अत्यंत सतर्क राहून आणि परस्परांमध्ये समन्वय ठेवून काम करावे, तसेच जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची चोख दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.
या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, सभापती महेश नाटेकर, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांच्यासह संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे (पीपीटी) जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या पूर्वतयारीची सविस्तर माहिती दिली.
या वेळी आढावा घेताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, जिल्ह्यातील नदीकाठच्या भागात राहणाऱ्या वस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून तेथील सुरक्षा यंत्रणा नेहमी अलर्ट मोडवर ठेवली पाहिजे. तसेच कोकणातील घाट रस्ते हे संवेदनशील असल्याने घाटामध्ये दरड कोसळून कोणताही अपघात होणार नाही, याची सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारी घ्यावी. दरडप्रवण क्षेत्रात भूस्खलन रोखण्यासाठी आधीच आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव साहित्य व यंत्रणा सज्ज ठेवावी. विशेषतः मंडणगड येथील राज्य महामार्गाला संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ भेट देऊन पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती दुरुस्ती कामे करून रस्ता सुस्थितीत आणावा, जेणेकरून पावसाळ्यात ग्रामीण भागात एसटी बसेस पोहोचण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी परिवहन व रस्ते विभागाला दिल्या.
आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेताना पालकमंत्र्यांनी पावसाळ्याच्या दिवसांत उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांना आळा घालण्याच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालये सज्ज ठेवण्याचे आदेश दिले. रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा आणि रुग्णवाहिकांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वीची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत, तसेच रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावरील ज्या ठिकाणी भूस्खलन किंवा दरडी कोसळण्याची शक्यता असते, त्या जागांवर चोवीस तास सतर्क राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीच्या शेवटी पालकमंत्र्यांनी सर्व तहसीलदारांना कडक निर्देश दिले की, आपल्या कार्यक्षेत्रातील पूरप्रवण क्षेत्रे, दरडप्रवण भाग आणि भूस्खलन होणाऱ्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी आणि त्याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या दोन दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा. या बैठकीत पालकमंत्र्यांनी महसूल, महावितरण, रेल्वे, बंदर विभाग, मेरीटाईम बोर्ड, पतन आणि आरोग्य यांसह सर्व प्रमुख यंत्रणांच्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन पावसाळ्यात जनतेला कोणताही त्रास होणार नाही, या पद्धतीने काम करण्याचे आदेश दिले.







