राजापूर : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची धुरा भाजपाच्या ऋतुजा तावडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ऋतुजा तावडे या राजापूर तालुक्यातील विल्ये गावच्या सून असल्याने, मुंबईसारख्या महानगराचे नेतृत्व राजापूरच्या नात्याने जोडले गेले असून तालुक्यातून आनंद आणि अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.
मुंबई महापालिकेचा निवडणूक निकाल जाहीर होऊन काही काळ लोटल्यानंतर महापौर कोण होणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यंदा महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने महिला उमेदवार निश्चित मानला जात होता. अखेर भाजपाने अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी ऋतुजा तावडे यांच्या नावाची घोषणा करत नेतृत्व स्पष्ट केले.
ऋतुजा तावडे या जरी सध्या मुंबईत वास्तव्यास असल्या, तरी राजापूर तालुक्यातील विल्ये गावाशी त्यांचे कौटुंबिक नाते घट्ट आहे.
सण-उत्सवांच्या निमित्ताने त्यांचे गावात नियमित येणे-जाणे असते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्या ‘आपल्याच’ असल्याची भावना आहे.
मुंबई महानगरपालिकेसारख्या देशातील सर्वात मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापौरपदी राजापूर तालुक्याशी नाते असलेल्या व्यक्तीची निवड झाल्याने, तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठेत भर पडली आहे. या निवडीचे स्वागत करत विल्ये गावासह संपूर्ण राजापूर तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे.
राजापूरची सुनबाई बनली मुंबईची महापौर; ऋतुजा तावडेच्या निवडीने राजापूरवासीय आनंदले







