अखिल मुंबईतील चिन्मय गीता फेस्ट २०२५ मध्ये प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
मकरंद सुर्वे / संगमेश्वर
संगमेश्वरजवळील निढळेवाडी येथील अवघी सहा वर्षांची चिमुकली श्रीशा अनुप पिंपरकर हिने आपल्या वयाला साजेशी मोठी कामगिरी केली आहे. चिन्मय मिशन मुंबई आयोजित चिन्मय गीता फेस्ट २०२५ या प्रतिष्ठित स्पर्धेत अखिल मुंबई क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावून तिने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली आहे.
सध्या आयआयटी मुंबई येथे सीनियर केजीमध्ये शिक्षण घेत असलेली श्रीशा ही संस्कृत श्लोकांच्या पठणात पारंगत असून तिने श्रीमद्भगवद्गीता अध्याय १५ पुरुषोत्तम योग मधील सर्व श्लोक अस्खलित उच्चारांसह मुखोदगत केले आहेत.
दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी शालेय स्तरावर पहिले बक्षीस मिळवल्यानंतर तिने २१ सप्टेंबर रोजी क्षेत्रीय स्तरावर आणि १२ ऑक्टोबर रोजी अखिल मुंबई प्रदेश स्तरावरही पहिले क्रमांक मिळवून तिहेरी यश संपादन केले.
संस्कृतमधील अवघड शब्दांचे तीक्ष्ण व स्पष्ट उच्चारण बघून परीक्षक आणि प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. श्रीशाच्या या अपूर्व यशाबद्दल आयोजक मंडळासह ग्रामस्थ आणि शिक्षकांनी तिचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
संगमेश्वर निढळेवाडीच्या श्रीशा पिंपरकरचा राष्ट्रीय पातळीवरील प्रवास!
