रत्नागिरी : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगांव, रत्नागिरी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम दिनांक २४ जून २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता महाविद्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आला होता.
पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत महाविद्यालयाच्या परिसरातील विविध मोकळ्या जागांमध्ये एकूण ५५ झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये नारळ, कोकम, अशोक, बदाम, गुलमोहर अशा विविध प्रकारच्या स्थानिक व पर्यावरणपूरक झाडांचा समावेश होता. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे परिसरातील पर्यावरण संतुलन राखणे, हवेची गुणवत्ता सुधारणा करणे, महाविद्यालयाचे सौंदर्य वाढविणे आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी जाणीव निर्माण करणे हा होता.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष सुरेश मोहिते व प्रा. डॉ. स्वप्नजा आशिष मोहिते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्राचार्य डॉ. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव, श्री. निलेश मिरजकर, श्री. रोहित बुरटे, श्री. सुशिल कांबळे, बोट स्टाफ, इतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
हा वृक्षारोपण उपक्रम म्हणजे केवळ एक पर्यावरणीय कृती नसून, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले जातील, अशी माहिती आयोजकांनी दिली.
मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगांव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

Leave a Comment