रत्नागिरी : उक्षी गावात क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी आणि स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘ऑल उक्षी बॉईज’ यांच्या वतीने प्रकाशझोतातील भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ६ आणि ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता या स्पर्धेचा थरार क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
या स्पर्धेसाठी आयोजकांनी आकर्षक बक्षिसांची घोषणा केली आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक म्हणून ११,१११ रुपये आणि आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला द्वितीय पारितोषिक ७,७७७ रुपये आणि आकर्षक चषक, तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला ३,३३३ रुपये आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सांघिक बक्षिसांशिवाय खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी वैयक्तिक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. यामध्ये उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई आणि स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू यांनाही गौरवण्यात येईल.
ही स्पर्धा उक्षी येथील जामा मस्जिद जवळच्या मैदानावर प्रकाशझोतात (नाईट मॅचेस) खेळवली जाणार आहे. स्पर्धेची प्रवेश फी ७०० रुपये असून ही स्पर्धा ‘एक ग्रामपंचायत मर्यादित’ स्वरूपाची असणार आहे. स्पर्धेत पारदर्शकता राहण्यासाठी प्रत्येक खेळाडूने आपले ओरिजनल आधार कार्ड सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि पंचांशी वाद घालणाऱ्या संघाला बाद केले जाईल, असे कडक नियम आयोजकांनी घालून दिले आहेत. तसेच संघाच्या नाव नोंदणीसाठी ३५० रुपये गुगल पे द्वारे आधी भरून आपले नाव निश्चित करणे आवश्यक आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी नावनोंदणीसाठी मेहरान काझी (९७२१८६४०४६९) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच प्रवेश शुल्क भरण्यासाठी जुनेद खान (९३७०१२२२९८) यांच्या गुगल पे नंबरचा वापर करावा. या क्रीडा स्पर्धेचे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले असून परिसरातील क्रीडा प्रेमी आणि कबड्डी संघांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘ऑल उक्षी बॉईज’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.






