रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनानिमित्त शहरातील अनेक संस्थांनी एकत्र येत मिरकरवाडा येथील मिऱ्या समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि टाकाऊ वस्तू गोळा करण्यात आल्या. या मोहिमेच्या माध्यमातून वर्षभर समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.
शिवाजी हायस्कूल, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन शिरगाव, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, जलजीविका संस्था पुणे, सागरी सीमा मंच मिऱ्या आणि स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट रत्नागिरी या संस्थांनी एकत्र येऊन ही मोहीम यशस्वी केली.
कार्यक्रमाची सुरुवात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनाचे महत्त्व समजावून सांगितले आणि स्वच्छतेची शपथ दिली. या मोहिमेदरम्यान, समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आणि घरातील टाकाऊ वस्तू आढळून आल्या, ज्या सर्वांनी मिळून गोळा केल्या आणि त्यांची योग्य विल्हेवाट लावली.
यावेळी सागरी सीमा मंचाचे श्री. स्वप्निल सावंत, संजीव लिमये, रंजन आगाशे, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ. आसिफ पागरकर, अभिरक्षक डॉ. हरीश धम्मगये, श्री. नरेंद्र चौगुले, वर्षा सदावर्ते, अर्चना सावंत, जाई साळवी, श्री. रमेश सावर्डेकर, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राध्यापक निलेश मिराजकर, रोहित बुरटे, सुशील कांबळे, मयुरी डोंगरे यांच्यासह सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
शिवाजी हायस्कूलचे ५७ विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षकही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जलजीविका संस्था, पुणेच्या चिन्मय दामले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना हातमोजे आणि पिण्याचे पाणी पुरवले. या सर्व संस्थांनी मिळून हा समुद्रकिनारा वर्षभर स्वच्छ ठेवण्यासाठी कार्यक्रम आखण्याचे ठरवले आहे.
यावेळी ग्रामस्थांना आणि मिरकरवाडा येथील मच्छीमारांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आणि समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. या यशस्वी मोहिमेमुळे मिरकरवाडा परिसरातील रहिवाशांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली आहे.