GRAMIN SEARCH BANNER

कशेडी घाटरस्त्यावर शीतपेयांचा ट्रक कलंडला; तीव्र वळणाचा उतार पुन्हा ठरला धोकादायक, चालक जखमी

Gramin Varta
79 Views

पोलादपूर :  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी घाटरस्त्यातील चोळई येथील तीव्र वळणाचा उतार वाहनचालकांसाठी पुन्हा एकदा धोकादायक ठरला आहे. शनिवारी दुपारी या ठिकाणी शीतपेयांच्या बाटल्यांनी भरलेला एक ट्रक उलटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात ट्रकचालक जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे या धोकादायक वळणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथून मुंबईच्या दिशेने शीतपेयांच्या बाटल्यांचे पॅकिंग घेऊन निघालेला ट्रक (क्रमांक एमएच ४६ सीक्यू ५१८६) कशेडी घाटातील चोळई येथील तीव्र वळणाच्या उतारावर आला असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी, भरधाव ट्रक रस्त्यावरच कलंडला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक रस्त्यावर आडवा झाला आणि त्यातील शीतपेयांच्या बाटल्यांचे बॉक्स अस्ताव्यस्त विखुरले गेले. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमी चालकाला तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र, पोलादपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सतीश पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला केला आणि वाहतूक सुरळीत केली.

चोळई येथील हे तीव्र वळण आणि उतार गेल्या अनेक वर्षांपासून अपघातांचे केंद्र बनले आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या वेळी या धोकादायक वळणाचा विचार करून तो सरळ करणे अपेक्षित होते, मात्र तसे न झाल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. यापूर्वीही या ठिकाणी रिक्षेतील विद्यार्थिनींचा अपघात, आमदार योगेश कदम यांचा अपघात यांसारख्या अनेक मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महामार्ग प्रशासनाने या धोकादायक वळणावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. वळण सरळ करणे शक्य नसल्यास किमान या ठिकाणी पुरेसे गतिरोधक, दिशादर्शक फलक आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येतील. पोलादपूर पोलीस या अपघातप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Total Visitor Counter

3223659
Share This Article