कोकणाविषयीच्या सकारात्मक साहित्यनिर्मितीची गरज – उदय सामंत

saurabhsalvi26@gmail.com
3 Min Read

चिपळूण : विपुल निसर्गसंपदेने नटलेल्या कोकणात सारे काही आहे. मात्र त्याचे सादरीकरण आपणच आपल्या पद्धतीने विविध स्तरावर केले पाहिजे. विशेषतः साहित्यिकांनी कोकणच्या दृष्टीने सकारात्मक लिखाण करायला हवे, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.

डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेतर्फे मांडकी-पालवण (ता. चिपळूण) येथे आयोजित राज्यातील पहिल्या ग्रामीण, कृषी, सहकार मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, कोकणच्या तुलनेत कॅलिफोर्निया केवळ दहा टक्के आहे. कोकण म्हणजे निसर्ग आहे, तर कॅलिफोर्निया म्हणजे कृत्रिमता. त्यामुळे कोकणातील निसर्ग टिकवू या. बॅरिस्टर नाथ पै यांनी आखलेल्या मार्गावरूनच आपला प्रवास सुरू आहे. कोकण रेल्वेचे निर्माते मधू दंडवते यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला, तर चरित्रकार धनंजय कीर यांचे नाव रत्नागिरीतील उपकेंद्राला देण्यात आले आहे. अशा प्रकारे कोकणच्या सुपुत्रांचा सन्मान आपण आपल्या पद्धतीने केला आहे.

यावर्षी विश्व मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होत असून, कुसुमाग्रजांचे हे गाव आहे. जगभरातील मराठी भाषिकांनी येथे यावे, हा या संमेलनामागचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. सीमाभागातील मराठी ग्रंथालयांना शासनाने अनुदान दिल्यामुळे अनेक वाचनालये उभी राहत असल्याचे सांगत सामंत म्हणाले की, मातृभाषा टिकवण्यासाठी अशा साहित्य संमेलनांची नितांत गरज आहे. मात्र ही संमेलने केवळ चर्चेपुरती न राहता शासनाला मार्गदर्शन करणारी ठरली पाहिजेत.

पद्मश्री पोपटराव पवार यांना उद्देशून बोलताना सामंत म्हणाले की, ज्या पद्धतीने पोपटराव पवार यांनी गावांचा विकास केला, त्याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पाच मतदारसंघांतील प्रत्येकी दोन, अशी एकूण दहा गावे आदर्श गावांसाठी निवडण्यात येतील. या गावांना पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन करावे.

कोकण कृषी विद्यापीठाबाबत बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, कृषी विद्यापीठे ही संशोधनाची केंद्रे बनली पाहिजेत. येथून शास्त्रज्ञ घडले पाहिजेत, जे शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मदत करतील. कृषी विद्यापीठांमध्ये सुमारे २५ हजार एकर जमीन पडीक असून, तिचा संशोधनासाठी वापर व्हायला हवा. मराठी भाषा ही जगातील प्रगत भाषा असून, महाराष्ट्रात केवळ मराठीचीच सक्ती राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले की, शासनाच्या सहकार्यामुळे राज्यातील पहिले ग्रामीण साहित्य संमेलन येथे आयोजित करता आले. साहित्यिकांनी नेहमी सकारात्मकता मांडली पाहिजे. भाषा आणि समाजा-समाजात वाद व विद्वेष निर्माण होईल, असे लिखाण टाळावे. बोलीभाषा टिकवण्यासाठी आणि मराठी अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वांचेच योगदान आवश्यक आहे.

स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. संजय भावे म्हणाले की, जगात शेती आणि शिक्षण हीच शाश्वत क्षेत्रे आहेत. मात्र अलीकडच्या ग्रामीण लिखाणात शेती, संशोधन व शेतकऱ्यांच्या समस्या पुरेशा प्रमाणात येत नाहीत. त्यामुळे साहित्यिकांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

यानिमित्ताने डॉ. तानाजी चोरगे लिखित ‘आंदोलन’ या पुस्तकाचे तसेच संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले, तर आभार अरुण इंगवले यांनी मानले.

कार्यक्रमाला पद्मश्री पोपटराव पवार, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, शिल्पा सुर्वे, समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह डॉ. निखिल चोरगे, बाबाजी जाधव, जयवंत जालगांवकर, अजय चव्हाण, सागर देशपांडे, डॉ. राजन गवस आदी मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *