वयाच्या ९० व्या वर्षीही परदेशवारी करणाऱ्या उक्षी येथील आयशाबी राजापकर यांचे निधन

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी :  तालुक्यातील उक्षी गावाचा एक मोठा आधारवड आणि साऱ्यांच्या लाडक्या आयशाबी राजापकर यांनी वयाच्या ९० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे उक्षी गावातील घराघरांवर शोककळा पसरली असून, एका चैतन्यमयी आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला आहे. वयाची नव्वदी ओलांडल्यानंतरही ज्या आजीच्या डोळ्यांत जग बघण्याची जिद्द आणि चेहऱ्यावर कायम हसू असायचे, त्या आशाबी आजींच्या जाण्याने गाव आज पोरका झाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

आयशाबी राजापकर या केवळ उक्षी गावातील एक ज्येष्ठ नागरिक नव्हत्या, तर त्या प्रेमाचा अखंड वाहणारा झरा होत्या. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव आणि प्रत्येकाला आपलेसे करून घेण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी गावातील पिढ्यानपिढ्यांवर मायेची पखरण केली. त्यांचं वय ९० पेक्षा जास्त होतं, पण मनानं त्या कोणत्याही तरुणापेक्षा कमी नव्हत्या. याच ऊर्जेच्या जोरावर त्यांनी या वयातही अमेरिका, सौदी अरेबिया अशा विविध देशांमध्ये अनेकदा परदेशवारी केली होती. सातासमुद्रापार फिरून आल्यावर त्या जेव्हा गावात आपल्या प्रवासाचे किस्से सांगायच्या, तेव्हा ऐकणारा प्रत्येकजण थक्क व्हायचा. परदेशातील संस्कृती पाहण्याची त्यांची ओढ आणि त्यांच्यातील तो उत्साह उक्षी गावाची शान होता.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच मुस्लिम महिल्यात स्मशान शांतता पसरली. ज्या आजीने आयुष्यभर सर्वांना प्रेम दिले, ती आज शांत झाली हे कोणालाही पचनी पडत नव्हते. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे आणि पतवंडे असा त्यांचा मोठा वेल विस्तारलेला परिवार आहे. आपल्या मागे कर्तृत्ववान पिढी सोडून जातानाच, त्यांनी प्रत्येकाच्या मनात एक कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण केली आहे. एका प्रेमळ युगाचा अंत झाला असून, उक्षीच्या मातीतील ही मायेची सावली आज कायमची हरपली आहे. त्यांना श्रद्धांजली वाहताना आज प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *