GRAMIN SEARCH BANNER

शिकारीच्या उद्देशाने बंदूक घेऊन फिरणाऱ्या दोघांवर कारवाई, तुळसणीतील दोघांना जामीन

Gramin Varta
4 Views

देवरुख (प्रतिनिधी): शिकारीच्या उद्देशाने विनापरवाना बंदूक घेऊन फिरणाऱ्या तुळसणी येथील दोन तरुणांना देवरुख पोलिसांनी पहाटेच्या सुमारास रंगेहाथ पकडले. या थरारक कारवाईत पोलिसांनी बंदूक, सात जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुरज सदानंद आग्रे (वय ३१, रा. तुळसणी आग्रेवाडी) आणि संदीप सोनू कातकर (वय ४०, रा. तुळसणी कातकरवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, सचिन पवार आणि अभिषेक वेलवणकर हे पांगरी, घोडवली आणि तुळसणी परिसरात गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. पहाटेच्या सुमारास पांगरी-घोडवली सीमेवर दुचाकीवरून संशयास्पद रित्या फिरताना हे दोघे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता, त्यांच्याकडे विनापरवाना बंदूक आणि जिवंत काडतुसे सापडली.

या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन पवार यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या संशयितांना जामीन मंजूर केला. ग्रामीण भागात वाढत्या शिकारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Total Visitor Counter

3254973
Share This Article