राजन लाड / जैतापूर
“नैसर्गिक आपत्ती निवारण” या सोशल मीडिया ग्रुपवर कशेळी येथे बोट उलटल्याची काही घटना घडली आहे का? असा संदेश टाकण्यात आला. या संदेशाने सर्वत्र खळबळ उडाली.
याची दखल घेत नाटे सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस प्रवर अधिकारी प्रमोद वाघ यांनी झटपट हालचाल केली. आपल्या कार्यक्षेत्रातील सागवे येथे जात असतानाच त्यांनी गाडी वळवून थेट कशेळीच्या दिशेने धाव घेतली. त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण पोलिस यंत्रणा तसेच कशेळीचे पोलीस पाटील प्रमोद आणि राजन आगवेकर यांना तातडीने माहिती दिली.
यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस पाटील प्रमोद सुतार , राजन आगवेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल इंगळे व सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कशेळी जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर पाहणी करून बोट मालकांकडे चौकशी केली.
याच दरम्यान जिल्ह्यातील काही पत्रकारांनी स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पत्रकारांनीही पोलिस यंत्रणेशी विचारणा केली असता, सुदैवाने अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले.
मात्र या छोट्याशा संदेशावरूनदेखील नाटे पोलीस ठाण्याची तत्परता, कशेळी पोलीस पाटलांची जागरूकता आणि पोलिसांनी झपाट्याने केलेली कारवाई कौतुकास्पद ठरली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणा किती सतर्क आहे याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.
कशेळी जवळच्या समुद्रात बोट उलटल्याच्या अफवेवर नाटे पोलिसांची तात्काळ कारवाई : दक्षतेचे कौतुक
