GRAMIN SEARCH BANNER

राज्यात कुष्ठरोग आता ‘नोटिफायबल डिसीज’

Gramin Varta
56 Views

नवीन रुग्णांची नोंदणी दोन आठवड्यांत करणे बंधनकारक

मुंबई: राज्य सरकारने कुष्ठरोगाला ‘नोटिफायबल डिसीज’ घोषित करत महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यातील सर्व डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि आरोग्य कर्मचारी यांनी कुष्ठरोगाचे निदान झालेल्या नव्या रुग्णांची नोंद दोन आठवड्यांच्या आत आरोग्य विभागाकडे करणे बंधनकारक असेल.

कुष्ठरोगाचा प्रादुर्भाव रोखणे, वेळेत निदान व तत्पर औषधोपचार रुग्णांपर्यंत पोहोचवणे हे यामागील मुख्य उद्दीष्ट आहे.

कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टरियम लेप्रे या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून त्वचा, परिघीय नसा, डोळे व काही आंतरिक अवयवांवर त्याचा परिणाम होतो. आजही जनमानसात या रोगाविषयी भीती, गैरसमज आणि सामाजिक भेदभाव कायम आहे. वेळेत निदान न झाल्यास किंवा उपचारात विलंब झाल्यास रुग्णांमध्ये विकृती निर्माण होऊ शकते. त्यामुळे “लवकर निदान आणि सातत्यपूर्ण उपचार हेच कुष्ठरोग नियंत्रणाचे प्रमुख उपाय” असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाने २०२७ पर्यंत ‘कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र’ हे ध्येय निश्चित केले असून संसर्गाची साखळी पूर्ण तोडणे, प्रसार शून्यावर आणणे, मुलांमधील विकृतीचे प्रमाण घटवणे आणि समाजातील भेदभाव दूर करणे यावर भर दिला जाणार आहे.कुष्ठरोग नियंत्रणात सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्व डॉक्टरांचा सहभाग अत्यावश्यक आहे. निदान झालेल्या रुग्णांना योग्य उपचार, नियमित पाठपुरावा तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना प्रतिबंधात्मक औषधे देणे अपेक्षित आहे. रायगड जिल्ह्यात सध्या ३९० रुग्ण औषधोपचाराखाली आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने वैद्यकीय व्यावसायिकांना कुष्ठरोग निदान व नोंदणीसंबंधी नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी आणि सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. प्राची नेऊळकर यांनी नागरिकांना आवाहन केले की, कुष्ठरोगाबाबत भीती बाळगू नये; लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.

Total Visitor Counter

3199191
Share This Article