GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन तरुणी जखमी

दापोली (प्रतिनिधी): तालुक्यातील कुडावळे ते दापोली मार्गावरील बोंडीवली येथे दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये दोन तरुणी जखमी झाल्या आहेत. बोंडीवली येथील साईबाबा मंदिरावमोरील वळणावर बुधवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्धी सुधाकर कमळकर (वय २२, रा. कुडावळे कळमकरवाडी) ही आपली ॲक्टिव्हा स्कूटी (क्रमांक MH 08 Q 2059) घेऊन श्वेताली सुधाकर कमळकर हिच्यासह दापोलीच्या दिशेने जात होती. यावेळी विरुद्ध दिशेने येणारा आरोपी किरण मधुकर कोळंबेकर (वय ३५, रा. बोंडीवली) याने आपल्या ताब्यातील दुचाकी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, अतिवेगाने आणि चुकीच्या बाजूने (राँग साईड) चालवत सिद्धी यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली.

या धडकेत सिद्धी कमळकर आणि श्वेताली कमळकर या दोन्ही तरुणी रस्त्यावर फेकल्या गेल्यामुळे त्यांना हातापायाला आणि शरीराच्या अन्य भागाला जखमा झाल्या आहेत. या अपघाताला पूर्णपणे आरोपीची बेदरकार वर्तणूक कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत सिद्धी कमळकर यांनी रात्री दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून किरण कोळंबेकर याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या अपघातामुळे वळणावरील वाढत्या वेगाचा आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Total Visitor Counter

3487786
Share This Article