संगमेश्वर : तालुक्यातील साडवली येथील वनाज इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीत अज्ञात चोरट्यांकडून मोठ्या चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. सुमारे अडीच लाखांचा माल घेऊन जाण्याची तयारी चोरट्यांनी केली होती; मात्र सुरक्षा रक्षकाच्या जागरूकतेमुळे त्यांनी पळ काढला. पळताना सोडलेला सामान व इतर पुरावे पोलिसांच्या हाती लागले आणि त्यावरून देवरूख पोलिसांनी जलदगतीने तपास सुरू केला. शेवटी चार जणांचा सहभाग स्पष्ट झाला आणि त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने या चौघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सायले शिंदेवाडी येथील विलास पुरोहित यांनी देवरूख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शुभम संजय जोयशी (१८), दीपक सुभाष गुरव (३३), आदित्य बळीराम भेरे (२४) व प्रदीप चंद्रकांत गुरव (२६) या चार जणांवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
११ नोव्हेंबरच्या रात्रीपासून १२ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला. चोरट्यांनी कंपनीच्या भिंतीवरून उतरून गॅस बँक विभागातील लोखंडी दरवाजा उघडत आत प्रवेश केला. कंपनीतील जंक्शन ब्लॉक, फोजिंग, ड्रम, कट असे विविध स्पेअर पार्ट्स गोणत्यांमध्ये भरून सुमारे २ लाख ४५ हजार किमतीचा मुद्देमाल बाहेर काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. एकूण १४ पोत्यांमध्ये १३०७ वस्तू, अंदाजे ४६५ किलो वजनाचा माल त्यांनी तयार ठेवला होता.
ही पोती पळताना जागीच सोडून दिल्यामुळेच पोलिसांना तपासाचा धागा मिळाला. काही पोत्यांवर ‘दातार ट्रेडर्स, साखरपा’ असे लिहिलेले असल्याने आरोपींपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करून चारही संशयितांना अटक केली आणि त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय अधिकारी सुरेश कदम व देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, सचिन पवार, अभिषेक वेलवणकर, आर्या वेलवणकर व सचिन लगारे यांचा समावेश होता.
चारही आरोपींना देवरूख न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर करीत आहेत.
देवरूख : साडवलीतील कंपनीत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना अटक; 4 दिवसाची पोलिस कोठडी






