कवी खावर यांचा आज स्मृतीदिवस.. याबद्दल जेष्ठ साहित्यिक इकबाल शर्फ मुकादम यांनी लिहिलेला विशेष लेख
३५ वर्षे झाली. कवी खावर सर या या जगातून निघून गेले. त्यांच्या लेखणी विषयीं अनेकदा लिहुन झाले. विविध कवी संमेलनात सांगून झाले. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला बदिउज्जमा खावर विचार मंच असे नाव देण्यांत आले. चिपळूण येथील नामवंत पुस्तक वाचनालय लोटिस्मा (लोकमान्य टिळक स्मारक मंदिर) येथील दालनात सरांची तसबीर लावण्यांत आली आहे. हा चिपळूण वासीयांनी दिलेला कवी खावर यांस सर्वोच्च सन्मान होय! तरीही खावर दुर्लक्षित का राहतात?
काय सांगू मी, कसा मज सापडेना चेहरा
द्याल का कोणी जरा शोधून माझा चेहरा
बदिउज्जमा ‘खावर’ हे नांव कोकणातील साहित्य क्षेत्रात नामवंत असलेल्यांनी मान्य केले…उर्दू तसेंच मराठी काव्यात गजल हा सर्वात कठीण प्रकार खावर सर आपल्या विशेष शैलीत सहज सांगून गेलेत. त्यांचे दिवान वाचकांना मंत्रमुग्ध करणारे आहे. त्यांनी लिहिलेला प्रत्येक शेर हा ‘खास’ समजला जातो. जेव्हांपासुन सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म सर्वांना ज्ञात झाला आणि अनेकांना देवनागरी लिपीत सहज टाईप करता येऊ लागले, तेंव्हा पासून ‘समग्र खावर’ यांच्या गजल संग्रहातून साप्ताहिक एक-एक गजल लिहून रसिकांना मी शेर करत आलोय. वाचकांनी सुद्धा त्यांस मनसोक्त प्रतिसाद दिला. मराठीतील त्यांचे साहित्य अनेकांना पुस्तकाचे मानधन देऊन विकत घ्यायचे आहे अगदी आजही पण प्रकाशकाकडे पुस्तकाच्या नवीन प्रती सध्या तरी उपलब्ध नसल्याने, रसिकांची निराशा
होत आहे.
खुद्द दापोलीतील रहिवासी आणि गजल हा प्रकार समजणारे, जाणकार, कद्रदान यांनी कविवर्य खावर यांच्या काव्याला अनेकांपर्यँत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ज्यांमध्ये माझ्या मते सर्वज्ञात असलेले साहित्यिक, पत्रकार बंटी कांबळे, कवी सुनील कदम, पत्रकार मुश्ताक खान, डॉ.कैलास गांधी, कवी बंटी मोरे, कवी सुदेश मालवणकर इत्यादी नांवे विशेष उल्लेखनीय आहेत. त्याशिवाय दापोलीतले एक व्यावसायिक नदीम मुकादम यांनी टिळक स्मारक मंदिर येथे भर पावसाळ्यात ‘एक शाम खावर के नाम’ असा कार्यक्रम स्वखर्चाने घडवून आणला होता. ज्यामध्ये मी स्वतः सामील झालो होतो. शिवाय तत्कालीन पोलीस निरीक्षक, तहसीलदार आणि इतर अनेक शासकीय, निमशासकीय अधिकारी सुद्धा या साहित्यिक कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. यावेळी खावर भाभी यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला होता.
होऊ दे छान से एक गाणे तुझे
आज चालायचे ना बहाणे तुझे
हे नवे लोक ; रुचतील यांना कसे?
सूर आहेत ‘खावर’ पुराणे तुझे
अगदी अलीकडच्या काळात खावर सरांचे अप्रकाशित उर्दू कलाम त्यांच्या कुटूंबियांनी कुलियात-ए-खावर या शिर्षकाने तीन खंडातील एक संच, उर्दू भाषेतील मुंबई स्थित मान्यवर आणि इतर निमंत्रित उर्दू भाषिक चाहत्यांच्या समवेत बांद्रा-मुंबई येथील एका भव्यदिव्य समारोहात प्रकाशित करण्यांत आला. ज्यामध्ये गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी खावर लिखित एक गजल सुश्राव्य स्वरात सादर केली. उपस्थित गजल चाहत्यांनी त्यांस टाळ्यांच्या गजरात दाद दिली. खावर यांचे अनुयायी पुणे, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, संपूर्ण कोकण आणि इतरत्रही बरेच आहेत. खावर एक विचार आहे तो शाळा-कॉलेजातून वाचला गेला पाहिजे. ते स्वतः शिक्षक होते. मराठी साहित्य जगतातील सर्व मान्यवरांनी त्यांचा आदर केला आहे. आजही त्यांचा विसर हाऊ नये, आजच्या पिढीने कवी खावर यांचे दिवान वाचले पाहिजे.
माझ्यासवे हवाही धुंदीत गात होती
मी भेटलो प्रियेला ती चांदरात होती
ठरलो न मी विजेता हेही बरेच झाले
मी जिंकलो तरीही माझीच मात होती
सोडून विश्व ‘खावर’ गेले कुठे कळेना
विश्वात माणसांची जी एक जात होती
आजच्या पिढीने विशेष करुन गजल लिहिणाऱ्यांनी आणि गजलेत रुचि असणाऱयांनी “समग्र खावर” हे मराठी गजलांचे पुस्तक आवर्जून वाचावे. प्रत्येक गजलेचा विषय वेगळा, सांगणे वेगळे, निसर्ग आहे, कोकण आहे, वैचारिक आविष्कार वेगळा आहे. खावर सरांचा मोजक्या शब्दांतला जीवन जगण्याचा निःस्वार्थी उपदेश वेगळा आहे. खावर कोकणी होते, मात्र त्यांचे लिखाण महाराष्ट्र, विदेशातील मराठी काव्य रसिकांना भावणारे आहे. गेली अनेक वर्षे मी वार्षिक एक लेख लिहून रसिकांना शेर करत आलोय. सोशल मीडिया नसतांना स्थानिक प्रिंट मीडिया मध्ये प्रकाशित व्हायचा. आजही मला हा लेख लिहितांना त्यांचे ‘समग्र खावर’ हे पुस्तक समोर ठेवावेच लागते. खावर जसे सहज समजेल असे काव्य लिहिणारे कवी होते तसेच त्यांच्या काही गजला एकदाच वाचून नाही कळू शकत. काहिसे गूढ विचार असलेले काव्य कवी खावर आपल्या रचनेत सांगुन जातात.
शोधाव्यास दाणे जी एकदा निघाली
परतून पाखरे ती घरट्याकडे न आली
लाटाही शांत होत्या, वाराही मंद होता
ऐशात देव जाणे का गलबते बुडाली?
विहिरी खणून आता उपयोग काय ‘खावर’
केव्हांच सर्व वसती वणव्यात भस्म झाली…
त्यांच्या या काव्यातील फक्त तीन अशार केवळ उदाहरणार्थ घेतले आहेत. सुमारे चार दशकांपासून ते सांगत आहेत सर्वांना, जल है, तो कल है. विहिरी खणा, जलसाठे वाढवा. पाण्याचा दुरुपयोग टाळा. असा विचार काव्य माध्यमातून कवी फार कमी असतील.
कला, मानवास लाभलेला ईश्वरी आशिर्वाद आहे. कले मुळे माणूस स्वतःविषयी तसेच सर्वस्वी समाजाविषयी शुद्ध विचार ठेवू शकतो. कलेत रुची निर्माण झाली की माणूस कलासक्त होतो. ज्यांस कला उमजली तो कलाकार होतो. कवी खावर यांच्या काव्य पंक्तीत कमालीची कशीष होती, आजही आहे. प्रत्येक गजल हा एक पूर्ण विषय आहे. त्यावेळी गजलच्या माध्यमातून व्यक्त होतांना तत्कालीन कोकणातील वाचकांनी कदाचित विशेष दाद दिली नसावी. कारण त्यांच्या उर्दू काव्यास जो प्रतिसाद लाभला तो कोकणाबाहेरील चाहत्यांकडूनच…उत्तरप्रदेश उर्दू अकॅडमी तर्फे त्यांचे साहित्य गौरविण्यात आले!
घडीसे लाख मेहेंगा तो
घडी का वक्त होता है
जो उसकी कद्र करता है
उसी का वक्त होता है
आज कवी खावर यांना त्यांच्या हयातीत किती मानसन्मान लाभले, त्यांचे प्रकाशित साहित्य कसे गौरविण्यात आले ते जाणून घेण्यापेक्षा त्यांचा सच्चा चाहता वाचकवर्ग संपूर्ण जगभरातील मराठी आणि उर्दू ज्या-ज्या ठिकाणी बोलली, लिहिली आणि वाचली जाते त्या-त्या ठिकाणी खावर यांचे साहित्य पोहोचले आहे. त्यांच्यातल्या काव्य प्रतिभेला सलाम म्हणून यापुढे “पंडित बदिउज्जमा खावर” या नावाने त्यांचे साहित्य वाचले जावे असे त्यावेळीं दापोलीतील एक साहित्यिक सभेत जाहिर करण्यांत आले होते! त्यांच्या निवडक ६ गजलांचे एक वार्षिक कॅलेंडर सुद्धा प्रकाशित करण्यांत आले होते, हे विशेष! कवी खावर हे कुणा एका विशिष्ट समाजाचे नसून त्यांचे प्रकाशित साहित्य मराठी, उर्दू भाषिकांना मार्गदर्शक ठरेल असे आहे.
इंसान अपनी मिआद मे
लढता रहा है हयात से
जो करे लिहाज बुजुर्ग का
उसको मेरा सलाम है!
आज कवी खावर यांना कोकणातले सुरेश भट असे संबोधले जाते. हा दोन्ही प्रतिभावंत शायरांपेक्षा गजलेचा सन्मान आहे. सुरेश भट आणि बदिउज्जमा खावर हे तेव्हां ग्रेट होते आजही त्यांची गजल लाखो दिल की धडकन समजली जाते. मुबंई येथील सागर प्रतिष्ठान या साहित्यिक संस्थेच्या वतीने “समग्र खावर” हे अप्रतिम पुस्तक प्रकाशित करण्यांत आले आहे. मी आजही त्या पुस्तकाचा अभ्यासक आहे. शब्दकोश (लुगात) जसा जपावा तसे ते पुस्तक माझ्या संग्रही आहे.
वरुण राजाची दिशा
ना कळे मज ना तुला
तो अभिषेकी मनाचा
चहू दिशांनी बरसला
शेवटी, बदिउज्जमा ‘खावर’ यांना त्यांच्या २०२५च्या ३५व्या स्मृती दिनी विनम्र अभिवादन करतो. समस्त गजल प्रेमींनी त्यांना आदरांजली वाहिलीच असेल, जमल्यास इतर सर्व मित्रांना हा लेख शेर करा. ही नम्र विनंती करतो आणि थांबतो!
इक्बाल शर्फ मुकादम
९९२०६९४११२