GRAMIN SEARCH BANNER

दापोलीचे सुपुत्र अक्षय महाडिक यांची उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगर येथे पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती

खेड :  कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत, दापोलीचे सुपुत्र अक्षय संजय महाडिक यांची उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे पोलीस अधीक्षक पदी पदोन्नती झाली आहे. मूळचे दापोली तालुक्यातील माटवण गावचे रहिवासी आणि सध्या खेड तालुक्यात वास्तव्यास असलेल्या अक्षय महाडिक यांच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अक्षय महाडिक यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून २९ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय पोलीस सेवेची सूत्रे हाती घेतली होती.

२०२२ च्या आयपीएस-आरआर बॅचचे अधिकारी असलेल्या महाडिक यांनी आपल्या अल्प कारकिर्दीत कामाचा प्रभावी ठसा उमटवला असून, त्यांच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेत २६ जानेवारी २०२६ रोजी त्यांना ‘डीजी कमेंडेशन डिस्क’ (सिल्व्हर) या विशेष सन्मानाने गौरविण्यात आले आहे. १ जानेवारी २०२६ पासून त्यांना वरिष्ठ श्रेणी लागू झाली असून ३० मार्च २०२६ रोजी त्यांनी मुजफ्फरनगर येथे पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. एका ग्रामीण पार्श्वभूमीतून येत उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्यात वरिष्ठ पोलीस पदावर विराजमान झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या या कामगिरीमुळे कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस जिल्हयातील विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Total Visitor Counter

3484893
Share This Article