नवी दिल्ली: काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला गुन्हा दाखल करण्याचा आदेश कायम ठेवत, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका बुधवार, दि.३० जुलै रोजी फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे संबंधित पोलीस अधिकारी आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला आहे, असे सिध्द करण्यास वकिल आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कसोटीचे प्रयत्न केले होते. या प्रकरणात पोलिसांनी तो नैसर्गिक मृत्यू असल्याचा दावा केला, मात्र या दाव्याला आव्हान देत आंबेडकर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. आंबेडकरांनी स्वतः या प्रकरणात युक्तिवाद केला होता.
मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात गंभीर दखल घेत
पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. राज्य सरकारने या आदेशाविरूध्द सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारले की, ‘गुन्हा का दाखल केला नाही?’ अशा प्रकारे हे प्रश्न पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतात. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन होणार की नाही,हे काही दिवसातच स्पष्ट होईल.
प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य
या प्रकरणी वकिल प्रकाश आंबेडकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, ‘दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या प्रकरणात राज्य सरकारच आरोपी आहे. मृत्यू सरकारच्या ताब्यात असताना झाला आहे आणि त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने आमची बाजू ऐकून घेतली. उच्च न्यायालयाने दिलेला गुन्हा दाखल करण्याचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही, त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होते का, हे पाहावे लागेल.’ वकिल आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची कारणीमीमांसा तपासणी करणाऱ्यांना डॉक्टरांना आरोपी करण्याची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणाने एक नवा मोड घेतला आहे. या प्रकरणात संबंधित पोलीस आणि डॉक्टरांवर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.