GRAMIN SEARCH BANNER

सुर्यमंदिर प्रकरणावरून माझ्या वक्तव्याचा विपर्यास; मला बदनाम करण्याचा प्रयत्न – पालकमंत्री उदय सामंत

विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राजापुरात सूर्यमंदिर नाही असे सामंत यांनी म्हटले होते, त्यावर स्पष्टीकरण दिले

राजापूर / प्रतिनिधी :
राजापूर तालुक्यातील चिंचबांध येथील पुरातन वास्तु सुर्यमंदिर आहे का या वादग्रस्त विषयावर विधानपरिषदेत दिलेल्या उत्तराचा विपर्यास करून, आपली बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. राजापुरात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत भूमिका मांडली.

सामंत म्हणाले की, विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना नगरविकास विभागाकडून मिळालेल्या अहवालावर आधारित माहिती मी राज्याचा मंत्री म्हणून सभागृहात दिली. दिल्ली पुरातत्व विभाग व राजापूर नगरपरिषद यांच्या अहवालात सदर वास्तू सुर्यमंदिर नाही असे स्पष्ट करण्यात आले असून त्याची नोंद अधिकृतरीत्या रेकॉर्डवर आहे. मात्र या उत्तराचा विपर्यास करून फेक नरेटिव्ह पसरवून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न काहींनी केला.

“मी स्वतः हिंदू असून धर्माचा अभिमान बाळगतो. माझे आई-वडीलही हिंदूच आहेत. त्यामुळे हिंदुत्व शिकविण्याची गरज नाही. उलट धर्मासाठी अनेक ठिकाणी आपण पुढाकार घेतला आहे,” असेही त्यांनी सांगितले.

सामंत यांनी पुढे सांगितले की, “जर कोणी माझ्याशी चर्चा केली असती, तर योग्य माहिती देऊन गैरसमज दूर करता आले असते. निषेधाचा ठराव करण्यापूर्वी माझी बाजू ऐकली असती तर परिस्थिती वेगळी झाली असती. परंतु काही मंडळींना नाहक मला टार्गेट करून फेक नरेटिव्ह पसरविण्यात आनंद मिळतो, हे दुर्दैवी आहे.”

चौकशीसाठी समिती गठीत
सदर पुरातन वास्तु सुर्यमंदिर आहे का याचा निर्णय करण्यासाठी राजापूर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. या समितीत प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी, पुरातत्व विभागाचे संचालक व सहाय्यक संचालक, तसेच सकल हिंदू समाज व मुस्लिम समाज व वक्फ बोर्डाचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. ही समिती प्रत्यक्ष पाहणी करून १० ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करेल. अहवालात वास्तू सुर्यमंदिर असल्याचे स्पष्ट झाल्यास ते हिंदूंचेच असल्यास कोणतीही हरकत नाही, असेही सामंत म्हणाले.

धर्मसभेचा ठराव व सामंत यांची टीका
शुक्रवारी झालेल्या सकल हिंदू समाजाच्या धर्मसभेत ही वास्तु सुर्यमंदिर असल्याचा ठराव करण्यात आला, तसेच पालकमंत्र्यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र या ठरावाचे अनुमोदक म्हणून नाणीजधामचे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य आणि आ. संग्राम जगताप यांची नावे घेतली गेली, परंतु दोघांनीही त्यांना याबाबत कल्पना नसल्याचे सांगितल्याचे सामंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सौरऊर्जेवर कशेळी गाव
पत्रकार परिषदेत बोलताना सामंत यांनी आणखी एका महत्त्वाच्या प्रकल्पाची माहिती दिली. राजापूर तालुक्यातील कशेळी गावात असलेल्या ऐतिहासिक सूर्य मंदिरामुळे हे संपूर्ण गाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौरऊर्जा प्रकल्पांतर्गत सौरऊर्जेवर चालणारे गाव करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेनंतर सामंत यांचे शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. यावेळी आ. किरण सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, तालुका प्रमुख दीपक नागले, प्रकाश कुवळेकर, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले, एड. शशिकांत सुतार, एड. यशवंत कावतकर आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

Total Visitor Counter

2474707
Share This Article