GRAMIN SEARCH BANNER

राजापूर अपडेट: वृद्ध महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटले; राजापूरमध्ये कारचालकाकडून ५ हजारांसह दागिने, मोबाईलची चोरी

Gramin Varta
219 Views

राजापूर: मुंबई-गोवा महामार्गावरील कोदवली बस स्टॉपजवळ राजापूर येथे जाण्यासाठी थांबलेल्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला एका अज्ञात कारचालकाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने फसवून तिच्या डोक्यात रॉडने हल्ला करत सुमारे ३३ हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी, दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ०६.०० ते ०६.१५ वाजेच्या दरम्यान घडली आहे.
या घटनेमुळे राजापूर परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोदवली तरळुवाडी येथील रहिवासी असलेल्या रश्मी प्रभाकर चव्हाण (वय ६५, व्यवसाय गृहिणी) या गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोदवली बस स्टॉप, मुंबई-गोवा हायवे येथे राजापूरला जाण्यासाठी थांबल्या होत्या. त्याच वेळी एका अज्ञात कारचालकाने त्यांच्याजवळ येऊन त्यांना राजापूर येथे सोडतो, असे सांगितले. चव्हाणबाईंनी विश्वास ठेवून त्या कारमध्ये बसल्या. मात्र, राजापूर येथे गाडी न थांबवता, त्याने ‘टायर अंकीता हॉटेलजवळ देण्याचे कारण सांगून, येताना राजापूर येथे सोडतो’ असे सांगत गाडी अंकीता हॉटेलच्या दिशेने नेली.

हॉटेल अंकीताकडे गाडी नेल्यानंतर तिथे टायर न देता, त्याने हॉटेल ग्रीनपार्क समोरून गाडी पुन्हा राजापूरकडे वळवली. राजापूरच्या दिशेने येत असताना गंगातीर्थ येथील पेडणेकर होमस्टेच्या पुढील वळणावर उन्हाळे येथे सायंकाळी ०६.१५ वाजण्याच्या सुमारास आरोपीने अचानक चव्हाणबाई यांच्या डोक्यात रॉड मारला. या हल्ल्यामुळे त्या भेदरलेल्या असतानाच आरोपीने त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम ५०००/- रुपये असलेली पर्स, व्हीवो कंपनीचा मोबाईल आणि त्यांच्या कानातील ०४ ग्रॅम वजनाची सोन्याची बुगडी हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पोबारा केला.

पीडित रश्मी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात आरोपीने एकूण ३३,०००/- रुपयांचा ऐवज चोरला आहे. यामध्ये ५०००/- रुपये रोख रक्कम, सुमारे २५,०००/- रुपये किमतीची ४ ग्रॅम वजनाची सोन्याची एक बुगडी आणि ३०००/- रुपये किमतीचा एक सिल्व्हर रंगाचा व्हिवो कंपनीचा मोबाईल यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून, अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Total Visitor Counter

3369558
Share This Article