संगमेश्वर:आज गावखेड्यात उत्तम रस्ते हवे आहेत, पाणी हवे आहे आणि तरुणांच्या हाताला काम हवे आहे. पण दुसरीकडे निवडणुकीच्या रात्री छुप्या मार्गाने हातात टेकवले जाणारे हजार रुपये स्वीकारून आपण आपल्याच मुलांच्या भविष्याचा सौदा करत आहोत का? असा काळजाला भिडणारा सवाल गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण भागात सध्या फोफावत चाललेली पैसे देऊन मते विकत घेण्याची ही घाणेरडी प्रथा जोपर्यंत आपण मुळासकट उपटून टाकत नाही, तोपर्यंत पुढच्या ५० वर्षांतही आपल्या गावांचा विकास होणे अशक्य आहे, अशी भीती त्यांनी अत्यंत पोटतिडकीने व्यक्त केली.
खंडागळे पुढे म्हणाले की, संगमेश्वर तालुका असो वा रत्नागिरी जिल्हा, आज मतदारांना पैशांचे आमिष दाखवून लोकशाहीचा लिलाव मांडला जात आहे. राजकीय नेत्यांना कष्ट न करता, लोकांची कामे न करता केवळ पैशाच्या जोरावर निवडणुकीत ‘पास’ व्हायचे आहे, हे वास्तव भयावह आहे. मात्र, या सत्तेच्या आणि पैशाच्या चिखलात सामान्य माणसाने का लोळायचे? ज्या तरुणांनी गावखेड्यात शिकून मोठे व्हावे आणि गावाच्या प्रगतीचे स्वप्न पाहावे, तेच सुशिक्षित तरुण जर या भ्रष्ट प्रथेला मूक संमती देत असतील किंवा विरोध करत नसतील, तर हा आपल्या लोकशाहीचा पराभव आहे.तरुणांनी या चुकीच्या गोष्टी घडत असताना विरोध करावा असे सांगताना सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे की,”तरुणांनो, गावाचा विकास विकला जात असताना बघत बसू नका, मतांच्या बाजारात लोकशाहीचा लिलाव थांबविण्यासाठी पुढाकार घ्या असे आवाहन त्यांनी केले आहे.
जर हीच परिस्थिती राहिली, तर भविष्यात कोणताही सामान्य घरचा, अभ्यासू आणि प्रामाणिक माणूस निवडणुकीला उभा राहण्याचे धाडस करणार नाही. केवळ धनदांडगेच सत्तेवर येतील आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कागदावरच राहतील. “आज घेतलेले काही रुपये म्हणजे उद्याच्या ५० वर्षांच्या विकासाची राखरांगोळी आहे,” असा इशारा देत खंडागळे यांनी ग्रामीण जनतेला आणि विशेषतः तरुणांना आवाहन केले की, गावाच्या अस्तित्वासाठी आणि पुढील पिढीच्या उज्वल भविष्यासाठी या ‘पैसा संस्कृती’ला वेळीच आवर घाला, अन्यथा आपल्या गावांचे वाटोळे होण्यास आपणच जबाबदार असू.
“तरुणांनो, गावांचा विकास विकला जात असताना बघत बसू नका!” सुहास खंडागळे यांची आर्त हाक; मतांच्या बाजारात लोकशाहीचा लिलाव थांबवा!






