चिपळूण: भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली, तरी आजही काही गावांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा आहे. चिपळूण तालुक्यातील तिवरे धनगरवाडी हे याचेच एक दुर्दैवी उदाहरण आहे. डोंगरमाथ्यावर वसलेल्या या वाडीत आजही पक्का रस्ता नाही, ज्यामुळे येथील ग्रामस्थांना रोज जीवघेण्या परिस्थितीतून प्रवास करावा लागत आहे.
तिवरे गावापासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या धनगरवाडीत धनगर समाजाच्या तीन वाड्या असून, सुमारे ८० घरे आहेत. येथील अनेक कुटुंबांचे अलोरे येथील कोयना प्रकल्पाच्या वसाहतीत पुनर्वसन झाले असले, तरी शेती आणि जुन्या घरांच्या ओढीने त्यांनी गाव सोडलेले नाही. मात्र, या तिन्ही वाड्या मुख्य प्रवाहापासून पूर्णपणे तुटलेल्या आहेत. वाडीत जाण्यासाठी आजही ५ किलोमीटरची पायपीट करावी लागते. ही पायवाट डोंगर, दगड आणि खोल खड्ड्यांनी भरलेली आहे. पावसाळ्यात तर ही वाट चिखलाने माखते आणि अत्यंत धोकादायक बनते.
रस्त्याच्या अभावामुळे येथील जीवनमान अतिशय कठीण झाले आहे. कोणी आजारी पडल्यास त्याला उपचारासाठी खालील गावात नेणे म्हणजे मोठा संघर्ष असतो. रुग्णवाहिका तर सोडाच, दुचाकीसुद्धा इथे पोहोचू शकत नाही. त्यामुळे आजारी व्यक्तीला किंवा गरोदर महिलेला डोलीतून घेऊन जावे लागते. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास कमरेएवढ्या पाण्यातून काठीच्या आधाराने नदी पार करावी लागते, ज्यामुळे वाहून जाण्याचा धोका असतो. मुलांच्या शिक्षणावरही याचा परिणाम होतो, कारण त्यांना शाळेत जाण्यासाठी रोज दीड ते दोन तास पायपीट करावी लागते. अनेक मुलांचे शिक्षण या बिकट परिस्थितीमुळे मध्येच थांबते.
ग्रामस्थांनी काही वर्षांपूर्वी काढलेला कच्चा रस्ताही देखभालीअभावी पुन्हा उद्ध्वस्त झाला आहे. यामुळे वन्य प्राण्यांच्या धोक्यातून मार्गक्रमण करत ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन जगत आहेत. रस्ता नसल्यामुळे आम्ही जगापासून वेगळे पडल्याची खंत येथील ग्रामस्थ व्यक्त करतात.
एकीकडे भारत अंतराळात मोठी भरारी घेत आहे, तर दुसरीकडे चिपळूणमधील धनगरवाडीसारखी गावे अजूनही रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी झगडत आहेत. स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे हे विदारक वास्तव आहे, असे येथील ग्रामस्थ अजित चव्हाण यांनी सांगितले.