जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप
लांजा: लांजा शहर विकास आराखड्यावरून (डीपी प्लॅन) काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप हे येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले बिनबुडाचे व जनतेत संभ्रम निर्माण करणारे असल्याचा पलटवार माजी नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी पत्रकार परिषदेत केला. लांजा तालुका काँग्रेसने केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी बाईत यांनी सोमवारी (३० जून) पत्रकार परिषद घेऊन सविस्तर खुलासा केला.
काँग्रेस पक्षाच्या लांजा तालुका शाखेने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन, नगरपंचायतीच्या तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवकांनी लांजा शहर विकास आराखडा तयार करताना जनतेला विश्वासात घेतले नाही आणि त्यांचा विश्वासघात केला, असा घणाघाती आरोप केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी मनोहर बाईत यांच्यासह सचिन डोंगरकर, प्रसाद डोर्ले, मंगेश लांजेकर, मधुरा लांजेकर, मधुरा बापेरकर, सोनाली गुरव, समृद्धी गुरव, दुर्वा भाईशेट्ये, वंदना काटगाळकर, मंगेश लांजेकर, राजेश हळदणकर, स्वरूप गुरव, प्रसाद भाईशेट्ये आदी माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष मनोहर बाईत म्हणाले की, “सुरुवातीला प्रारूप विकास आराखड्याची (Draft DP Plan) माहिती सर्व नगरसेवकांना देण्यात आली होती. त्यानंतर त्यामध्ये आढळलेल्या त्रुटी नगर रचना विभाग, रत्नागिरी यांच्याकडे दुरुस्तीसाठी पाठवण्यात आल्या होत्या.”
बाईत यांनी स्पष्ट केले की, “त्यानंतर लांजा नागरी पतसंस्थेच्या सभागृहात संपूर्ण लांजा-कुवे शहरवासीयांना हा प्रारूप विकास आराखडा प्रोजेक्टरवर नगर रचना विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी दाखवून सविस्तर माहिती दिली होती. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांच्या सूचना व हरकती समजून घेण्यात आल्या. इतकेच नाही, तर लांजा नगरपंचायतीच्या सभागृहात प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागातील नागरिकांना प्रारूप विकास आराखड्याची प्रोजेक्टरवर माहिती दिली होती आणि त्यातील त्रुटींवर नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानुसार आलेल्या हरकती व सूचनाही दिल्या गेल्या.”
ते पुढे म्हणाले, “प्रारूप विकास आराखड्यातील त्रुटी आणि हरकती-सूचनांचे पालन करून योग्य तो बदल करूनच तो जनतेसमोर सादर करावा, असा ठराव २८ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सभेत एकमताने पारित करण्यात आला होता.” बाईत यांनी नमूद केले की, “मी स्वतः नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कार्यकाळ १० फेब्रुवारी २०२५ रोजी संपुष्टात आला. त्यानंतर २६ मार्च २०२५ रोजी प्रशासनाच्यावतीने डीपी प्लॅन प्रसिद्ध करण्यात आला.”
रिंग रोड, आरक्षित भूखंड, झोन या बाबी गोपनीय असून त्यांचा सर्वाधिकार नगर रचना विभागाकडेच असतो. डीपी प्लॅनमध्ये या बाबी दर्शवण्याचा अधिकारही केवळ नगर रचना विभागाचाच असतो, असेही बाईत यांनी स्पष्ट केले. सभागृहातील नगराध्यक्ष व नगरसेवकांना यासंदर्भात कोणताही अधिकार नसतो, असेही त्यांनी सांगितले.
बाईत यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधत म्हटले की, “लांजा नागरी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या प्रारूप विकास आराखड्याच्या बैठकीत तसेच आमदार किरण सामंत यांच्यावतीने गणेश मंगल कार्यालय येथे २६ एप्रिल २०२५ रोजी आयोजित विकास आराखड्यावरील चर्चासत्रात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश राणे, महेश सप्रे, प्रकाश लांजेकर व नुरुद्दीन सय्यद तसेच इतर लांजा-कुवे येथील नागरिकही उपस्थित होते. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर आमदार किरण सामंत यांनी योग्य उत्तरे दिली होती.”
यामुळे काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांनी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी शहर विकास आराखड्या संदर्भात व्यवस्थित माहिती घ्यावी, असा टोला यावेळी माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांच्यावतीने लगावण्यात आला.