चिपळूण – चिपळूण येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता शेवटच्या दिवशी प्रांताधिकारी कार्यालय परिसरात राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी तब्बल ८ तर एकूण १३ तसेच नगरसेवक पदाच्या २८ जागांसाठी तब्बल ९३ असे एकूण १५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उबाठा पक्ष अशा सर्वच पक्षांसह अपक्षांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्या दिवशी देखील महायुती, महाविकास आघाडीबाबत कोणतेही चित्र स्पष्ट झालेले नाही. मात्र, शिवसेना-भाजप युती होणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नसल्यामुळे संभ्रमावस्था आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, कॉग्रेस, शिवसेना, उबाठा या तिघांनीही नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीची बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होणार आहे.
तब्बल आठ वर्षांनंतर चिपळूण नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दि. १० ते १२ ऑक्टोबरपर्यंत उमेदवार अर्ज दाखल झालेले नव्हते. दि. १३ पासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरूवात झाली. तर सोमवारी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी उडाली होती. यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी ८ तर एकूण १३, नगरसेवक पदाच्या २८ जागांसाठी ९३ तर एकूण १५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गट पक्षाने नगराध्यक्षपदासह १६ जागांवर तर राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाने नगराध्यक्षपदासह १५ जागांवर उमेदवारी अर्ज भरले आहेत. कॉग्रेसनेदेखील नगराध्यक्ष पदासह काही जागांवर तसेच शिवसेना उबाठाने नगराध्यक्ष पदासह २८ जागांवर उमेदवारी अर्ज भरले असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नगराध्यक्ष पदासह काही जागांवर उमेदवारी अर्ज भरले आहेत. अपक्षांनीदेखील आपले नशिब अजमावण्याचा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले शिवसेना शिंदे गटातील तथा माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी अचानक आपल्या पत्नीसह कॉग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुती व्हावी यासाठी या महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी संदर्भात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना-भाजपतर्फे उमेश सकपाळ यांनी तर राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गट पक्षातर्फे मिलिंद कापडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे महायुतीसंदर्भात संभ्रमावस्था आहे. या साऱ्या घडामोडी राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाला सध्यातरी बाजूला ठेवल्याचे चित्र आहे. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल.
चिपळुण ; नगराध्यक्ष पदासाठी १३ तर नगरसेवक पदासाठी १४१ उमेदवारी अर्ज






