GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणातील उड्डाण पुलासाठी मार्च २०२६चा मुहूर्त;गर्डर चढविण्याचे काम युद्धपातळीवर

Gramin Varta
180 Views

चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलाच्या कामाला आता गती आली असताना हे कोणत्याही परिस्थितीत मार्च २०२६ पूर्वी पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी जुने पिअर तोडण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. आता नवीन पिअर कॅप उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. तसेच पुलाच्या एकबाजूने गर्डर चढविण्याचे काम सुरु केले आहे. आतापर्यंत ३२ गर्डर चढविण्यात यश आले आहे. दोन क्रेनच्या सहाय्याने हे काम युद्धपातळीवर केले जात आहे.

मुबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटर दरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. साधारणपणे या पुलाची लांबी १८४० मीटर, तर रुंदी ४५ मीटर इतकी असून हा पूल कोकणातील महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा ठरला आहे. या पुलासाठी एकूण ४६ पिलर उभारण्यात आले असून बहादूरशेखनाका येथून या पुलाचे काम पावसाळ्यात सुरू केले. मात्र १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर या कामातील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या. तातडीने केंद्रातून तज्ज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी करण्यात आली होती. या समितीच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या डिझाईनमध्येच बदल सूचवले होते. यामध्ये सध्या पूल उभारणीत ४० मीटरचे गाळे ठेवण्यात आले होते. त्यामधील अंतर कमी करुन ते आता २० मीटरवर ठेवले आहे. त्यासाठी तेथे अतिरिक्त पिअर उभारण्यात आले आहेत. आता नवीन रचनेनुसार या पुलाचे काम सुरु केले आहे. यामध्ये पिअर कॅप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून एकूण ९५ पिअर कॅपपैकी अर्ध्याहून अधिक पिअर कॅपचे काम पूर्ण केले आहे. त्यासाठी तीन टीम काम करत आहेत. आता उर्वरित पिअर कॅपवर गर्डर चढविण्यासाठी दोन क्रेन मागविण्यात आले असून त्याआधारे महिनाभरात ३२ गर्डर चढविण्यात आले. अजूनही उर्वरित कामासाठी किमान नऊ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले आहे. पॉवरहाऊस ब्लॅक स्पॉटच्या वाटेवर मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण हद्दीतील पाग पा़वरहाऊस येथे असलेल्या चौकातून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. आतापर्यंत येथे अनेक अपघात घडले असून त्यात काहींना आपले प्राणही गमवावे लागले होते. सततच्या अपघाताच्या घटनांमुळे हा चौक भविष्यात ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जाण्याची भीती व्यक्य केली जात आहे.

Total Visitor Counter

3225878
Share This Article