GRAMIN SEARCH BANNER

देवरूखमध्ये अष्टांग योग वर्गांचा शुभारंभ; अनुभवी प्रशिक्षिका हर्षदा यादव करणार मार्गदर्शन

Gramin Varta
174 Views

देवरूख: सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढता मानसिक तणाव, मधुमेह, पाठदुखी आणि इतर शारीरिक व्याधींवर मात करण्यासाठी योगाभ्यास हा अत्यंत प्रभावी उपाय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर देवरूख येथे अष्टांग योग वर्गांचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून नागरिकांना सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली मिळणार आहे. या वर्गांचे वैशिष्ट्य म्हणजे अनुभवी योग प्रशिक्षिका हर्षदा यादव या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. हर्षदा यादव यांनी योगशास्त्रात एम.ए. पदवी संपादन केली असून, त्या भारत सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत मान्यताप्राप्त ‘योग वेलनेस इन्स्ट्रक्टर’ आहेत.

या योग वर्गांमध्ये योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा या त्रिसूत्रीवर भर दिला जाणार आहे. नियमित योगाभ्यासामुळे केवळ वजन नियंत्रणच नव्हे, तर मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. तसेच संगणकीय कामामुळे वाढलेली पाठदुखी आणि मानदुखी कमी करण्यासाठी हे वर्ग उपयुक्त ठरणार आहेत. हे वर्ग ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी उपलब्ध करून देण्यात आले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ घेता येईल.

या उपक्रमांतर्गत १२ वर्षांवरील मुले, मुली, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र बॅचेसची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांत हे वर्ग चालणार असून, प्रत्येकाच्या वेळेनुसार यात सहभागी होण्याची सोय उपलब्ध आहे. देवरूख आणि परिसरातील नागरिकांनी आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी इच्छुकांनी ७९७२५६५५२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून, सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

Total Visitor Counter

3357473
Share This Article