रत्नागिरी: रत्नागिरीच्या समुद्रात सध्या मासळीचा दुष्काळ जाणवत असल्याने रोजीरोटीसाठी सिंधुदुर्गच्या समुद्रात गेलेल्या रत्नागिरीतील पर्ससीन नेट नौकांना तेथील काही स्थानिक नौकांकडून लक्ष्य केले जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सिंधुदुर्गच्या हद्दीत मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीच्या नौकांना घेराव घालून त्यातील मासळी जबरदस्तीने हिसकावून घेणे, जाळी ओढून त्यातील मासे लुटणे आणि खलाशांना मारहाण करण्याच्या घटना वाढल्या आहेत. या वाढत्या दरोड्यांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुका पर्ससीन नेट मालक असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा पर्ससीन नेट संघटनेची तातडीची संयुक्त बैठक पार पडली असून, यात अन्यायाविरुद्ध सनदशीर मार्गाने प्रतिकार करण्याचा आणि पोलीस तक्रारी दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरीच्या किनारपट्टीवर मासळीची आवक घटल्याने येथील मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. बँकांचे हप्ते आणि नौकांचा खर्च भागवण्यासाठी अनेक मच्छीमार सिंधुदुर्गच्या समुद्रात किंवा साडेबारा नॉटिकल मैल क्षेत्राबाहेर मासेमारीसाठी जात आहेत. मात्र, रत्नागिरीची नौका आपल्या हद्दीत आल्याचे समजताच सिंधुदुर्गमधील काही नौका घोळक्याने येऊन रत्नागिरीच्या मच्छीमारांची लूट करत असल्याच्या तक्रारी संघटनांकडे प्राप्त झाल्या आहेत. ही लूट करताना अनेक वेळा तांडेल आणि खलाशांना धमकावून त्यांच्याकडून मासळी ओरबाडून घेतली जात आहे. समुद्रात चाललेल्या या दहशतीमुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर समस्येवर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत दोन्ही संघटनांनी आपल्या सदस्यांना ठोस भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. यापुढे जर समुद्रात अशा प्रकारे मासळी लुटण्याचा किंवा मारहाण करण्याचा प्रयत्न झाला, तर नौकांवरील तांडेल आणि खलाशांनी त्याला खंबीरपणे आणि सनदशीर मार्गाने विरोध करावा, असे ठरवण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या भागात ही लूट होईल, तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात तातडीने रीतसर तक्रार नोंदवण्याच्या सूचनाही नौका मालकांना देण्यात आल्या आहेत. आपल्या हक्काच्या व्यवसायावर होणारी ही गदा रोखण्यासाठी रत्नागिरीतील मच्छीमार संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून समुद्रातील ही गुंडगिरी थांबवावी, अशी मागणी मच्छीमारांकडून होत आहे.






