GRAMIN SEARCH BANNER

खेर्डी बाजारपेठेत मटका जुगारावर चिपळूण पोलिसांचा छापा

Gramin Varta
10 Views

चिपळूण: चिपळूण तालुक्यातील खेर्डी बाजारपेठ परिसरात जंगम वडापाव टपरीच्या आडोशाला बेकायदेशीरपणे मटका जुगार चालवणाऱ्या एका वृद्ध इसमावर चिपळूण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले असून, संबंधित आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ मार्च २०२६ रोजी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास खेर्डी बाजारपेठ येथील जंगम वडापाव टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’ नावाचा मटका जुगार खेळला जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शैलेश शांताराम वनगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाड टाकली. यावेळी विलास सखाराम मिरगल (वय ६२, रा. खेर्डी बाजारपेठ, ता. चिपळूण) हा स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून बेकायदेशीरपणे पैसे स्वीकारून जुगाराचे आकडे लिहून घेताना रंगेहाथ मिळून आला.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून २५०० रुपये रोख आणि जुगाराचे इतर साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी विलास मिरगल याच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, दुपारी ४.२६ वाजता या संदर्भातील अधिकृत नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल माणके करत आहेत.

Total Visitor Counter

3379163
Share This Article