रत्नागिरी : जिल्ह्यात अवैध दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या वर्षभरात जोरदार मोहीम राबवली आहे. २०२५ या वर्षात करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल २ कोटी ७२ लाख ५७ हजार ८७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १ हजार ५६ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रत्नागिरी युनिटसह भरारी पथकांनी वर्षभरात एकूण १ हजार १९९ गुन्हे दाखल केले. यामध्ये १ हजार ४४ वारस गुन्हे तर १५५ बेवारस गुन्ह्यांचा समावेश आहे. हातभट्टी दारू, रसायनांचा कच्चा माल, गोवा बनावटीचे विदेशी मद्य तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली १४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
महामार्ग व रेल्वेमार्गावर कडक नजर
मुंबई-गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण-कऱ्हाड या प्रमुख महामार्गांवर संशयास्पद वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. तसेच कोकण रेल्वेमार्गावरून होणारी दारू तस्करी थांबवण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या मदतीने प्रवाशांच्या सामानाची अचानक तपासणी सुरू ठेवण्यात आली. महामार्ग आणि रेल्वेमार्ग या दोन्ही ठिकाणी विभागाचा सतत वॉच असल्याचे दिसून आले. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये २९ हजार ७७३ लिटर हातभट्टी दारू, २ लाख ४६ हजार ४२० लिटर रसायनांचा कच्चा माल, २४ हजार ५५९.७४ बल्क लिटर गोवा बनावटीचे मद्य यांचा समावेश आहे.
डिसेंबरमध्ये विशेष मोहीम
नाताळ आणि वर्षाअखेरीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर २०२५ मध्ये कारवाईचा वेग वाढवण्यात आला. या एका महिन्यात १०२ गुन्हे दाखल करून ४९ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये १५ हजार लिटरहून अधिक गोवा बनावटीच्या मद्याचा समावेश आहे.
सराईतांवर वचक बसवण्यासाठी हद्दपारीचे प्रस्ताव
केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता सराईत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ९३ अंतर्गत १३७ हद्दपारीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ३१ प्रकरणांमध्ये आरोपींकडून ११ लाख २५ हजार रुपयांची चांगल्या वर्तणुकीची बंधपत्रे घेण्यात आली आहेत.
दरम्यान, कायदेशीर परवाना वाटपातूनही शासनाला महसूल मिळाला आहे. वर्षभरात २४३ मद्यसेवन परवाने देण्यात येऊन २ लाख २४ हजार रुपये महसूल जमा झाला. तसेच ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या १७ तात्पुरत्या क्लब परवान्यांमधून ९६ हजार ७०० रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले.
“अवैध मद्यनिर्मितीचे हॉटस्पॉट लक्षात घेऊन विशेष मोहीम सुरू आहे. पुढील काळातही जिल्ह्यात अवैध दारूविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली जाईल,” असे अधीक्षक कीर्ती शेडगे, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी यांनी स्पष्ट केले.






