GRAMIN SEARCH BANNER

पोलीस निरीक्षक झावरे यांच्या बदलीसाठी ठाकरे गट आक्रमक; दोन दिवसांत कारवाई न झाल्यास ‘संगमेश्वर बंद’चा इशारा

saurabhsalvi26@gmail.com
1.2k Views

रत्नागिरी : साडवली येथील बॅनर वादावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, या प्रकरणाला आता उबाठा गटाने अत्यंत आक्रमक वळण दिले आहे. संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांची या संपूर्ण वादातील भूमिका संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप करत, त्यांच्या बदलीसाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या विहित मुदतीत झावरे यांच्यावर कारवाई न झाल्यास संगमेश्वर तालुक्यात ‘सर्वपक्षीय बंद’ पुकारला जाईल आणि पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशारा ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर आणि रोहित तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. यासंदर्भात सोमवारी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला माजी पालकमंत्री रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

साडवली येथील बॅनर वादातून राजकीय पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला असून, या प्रकरणात पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. साडवलीतील विजय धने, शुभम धने व दीपक डोंगरे यांनी विजयी उमेदवार शमा संतोष जाधव यांचा बॅनर फाडून त्यांच्या वडिलांना धमकी दिली होती. यावेळी घटनास्थळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते, मात्र पोलीस निरीक्षकांनी या प्रकरणातील दोषींची बाजू घेतली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे, ज्या वेळी हा वाद झाला, त्या वेळी घटनास्थळी उपस्थित नसलेल्या अनेक निरागस तरुणांवर केवळ सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आक्षेपही यावेळी घेण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील तरतुदींनुसार लोकसेवक असूनही कायद्याच्या निर्देशांची जाणीवपूर्वक अवज्ञा केली आहे. तपासाच्या नियमांचे पालन न करता आणि सीसीटीव्ही फुटेज किंवा साक्षीदारांची कोणतीही शहानिशा न करता केवळ अधिकाराचा दुरुपयोग करून ही कारवाई केल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. या प्रकरणाच्या निपक्षपाती चौकशीसाठी तातडीने दुसऱ्या तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी पोलीस अधीक्षकांकडे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष बंड्या बोरुकर यांच्यासह माजी सभापती छोट्या गवाणकर, रोहित तांबे, राष्ट्रवादीचे निलेश भुवड, बाबा बोथले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3396243
Share This Article