GRAMIN SEARCH BANNER

शेट्ये कुटुंब व आप्तेष्ट यांचे सानिया स्विमिंग पूल व ग्रीन नेस्ट रिसॉर्ट येथे भव्य स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Gramin Varta
120 Views

एकी, संस्कार आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा अनोखा संगम

लांजा/अरबाज नेवरेकर : लांजा येथील सानिया स्विमिंग पूल व ग्रीन नेस्ट रिसॉर्ट, केळंबे येथे शेट्ये कुटुंब व आप्तेष्ट यांचे भव्य स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाले. विविध शहरांमध्ये वास्तव्यास असलेले शेट्ये परिवारातील सदस्य, नातेवाईक व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली होती.

या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून संपूर्ण शेट्ये घराणे एकत्र येत आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आणि कौटुंबिक एकोप्याचा सुंदर अनुभव घेताना दिसले. कार्यक्रमस्थळी आकर्षक सजावट, पारंपरिक वातावरण आणि उत्साहपूर्ण नियोजन यामुळे उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले गेले.

कार्यक्रमादरम्यान विविध मनोरंजनात्मक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, गाणी, नृत्य सादरीकरण, खेळ तसेच कौटुंबिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली.

यावेळी उपस्थितांना भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच परिवारातील ज्येष्ठ सदस्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या कुटुंबीयांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले.

लांजा येथील प्रतिष्ठित व मानकरी परिवार म्हणून शेट्ये घराण्याची विशेष ओळख आहे. सामाजिक बांधिलकी, परंपरा, संस्कार आणि धार्मिक वारसा जपणारे घराणे म्हणून शेट्ये परिवाराकडे आदराने पाहिले जाते. भगवती देवीवरील श्रद्धा, नवरात्र उत्सव, गणपती, दिवाळी, दसरा तसेच श्रावणातील धार्मिक परंपरा यामध्ये शेट्ये घराण्याचा सक्रिय सहभाग नेहमीच राहिला आहे. मंदिरातील मानमरातब, धार्मिक कार्यातील सहभाग आणि समाजसेवेची भावना हेच शेट्ये घराण्याचे खरे वैभव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना नितीन शेट्ये यांनी सांगितले की, “आजच्या धकाधकीच्या जीवनात नाती जपणे अत्यंत आवश्यक आहे. शेट्ये घराण्याच्या नव्या पिढीने आपल्या गौरवशाली परंपरा, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचे जतन करणे ही काळाची गरज आहे. अशा स्नेहसंमेलनातून एकोप्याची भावना अधिक दृढ होत असते.”

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेट्ये परिवारातील सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. कौटुंबिक ऐक्य, संस्कार, परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारे हे स्नेहसंमेलन उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना शेवटी व्यक्त करण्यात आली.

Total Visitor Counter

3393565
Share This Article