लांजा: शहरातील साई समर्थ रेसिडन्सी येथून एक ४२ वर्षीय व्यक्ती गेल्या चार दिवसांपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्ती बेपत्ता झाल्याची रीतसर नोंद करण्यात आली असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
लांजा पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, वैभव चंद्रकांत चोरगे (वय ४२, रा. साई समर्थ रेसिडन्सी, एफ विंग, रूम नं. १०३, लांजा, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी, १४ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वैभव चोरगे यांनी ‘मला रत्नागिरी एसपी ऑफिस येथे बोलावले आहे, त्यासाठी मी रत्नागिरीला जात आहे’, असे घरच्यांना सांगितले. त्यानंतर ते आपल्या मालकीची पांढऱ्या रंगाची नॅनो गाडी (क्रमांक एमएच.०४.एफझेड.०३३०) घेऊन घरातून बाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत.
पती वेळेत घरी न आल्यामुळे आणि त्यांचा कोणताही पत्ता लागत नसल्याने कुटुंबियांनी त्यांची काळजीपोटी शोधमोहीम सुरू केली. नातेवाईकांचे घर, मित्रपरिवार आणि आजूबाजूच्या सर्व संभाव्य परिसरामध्ये त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, सर्व प्रयत्न करूनही वैभव चोरगे यांचा कुठेही सुगावा लागला नाही. अखेर कोणतीही माहिती न मिळाल्याने त्यांच्या पत्नी अस्मिता वैभव चोरगे (वय ४१, रा. लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन पती बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या वर्णनानुसार, बेपत्ता वैभव चोरगे यांची उंची अंदाजे ५ फूट ८ इंच असून, चेहरा उभट, रंग सावळा, केस काळे आणि नाक सरळ आहे. घरातून बाहेर पडताना त्यांच्या अंगावर फुल शर्ट, फुल पँट, पायात ब्राऊन रंगाची सँडल, हातात घड्याळ आणि गळ्यात चांदीची चैन अशी होती. तसेच त्यांच्यासोबत पांढऱ्या रंगाची नॅनो गाडी (क्रमांक एमएच.०४.एफझेड.०३३०) आहे.
या गंभीर प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार करत आहेत. या वर्णनाची व्यक्ती किंवा नमूद केलेली नॅनो गाडी कोठेही आढळून आल्यास अथवा यासंबंधी काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ लांजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.






